आई आणि वेदना
- Apr 11
- 3 min read
मुलांना गाणे गायला आवडते तसेच त्यांना ऐकायलाही आवडते. वर्गात गणाला स्पिकर आणि माईक आणायला सांगितले आणि एकच जल्लोष सुरू झाला. अभ्यासाला आता सुट्टी मिळणार होती. मुलं मस्त आपापसात गप्पा मारू लागली होती. कोणते गाणे कोण गाणार म्हणून काही मुलं आपली योजना आखत होती. त्यात एकदाचा सुरू झाला गायनाचा कार्यक्रम यशपासून!
मुलं आपापली गाणी सादर करत होती. त्यात एकमेकांना प्रोत्साहन देत होती. वातावरण प्रसन्न होतं. मुलं आपापल्या जागेवर बसली होती. त्यात साईने माझ्याकडं मोर्चा वळवला. तो जवळ येत म्हणाला, “सर, तुम्ही गाणे म्हणा ना आता.”
तीच री ओढत प्रवीण म्हणाला, “सर, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा म्हणा ना?”
नको नको म्हणताना होकार कधी झाला ते कळालेच नाही. जीवनात मित्रांचे महत्त्व सांगताना कविता गायन करत होतो. मुलं भावूक झाली होती. त्यात आई हा विषय निघाल्यावर मी ‘आई’ या विषयावर कविता म्हणायला सुरुवात केली. शब्द ओठांवर आले आणि वर्गात एक वेगळंच भावविश्व दाटून आलं.
‘आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार!’
कवितेतील प्रत्येक ओळ मुलांच्या मनात खोलवर उतरत होती. काहींच्या डोळ्यांत चमक होती तर काहींच्या डोळ्यांत पाणी दाटायला लागलं. पुढे न थांबता, ‘हंबरून वासराले चाटते जव्हा गाय,
तव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय’
सह कविता गायला सुरुवात केली. आवाज आणि स्पिकर दोन्हींनी साद दिली. हळूहळू दोन-तीन मुलं हुंदके देत रडू लागली. वातावरण अचानक गंभीर झालं होतं. तिसरी कविता गायला सुरुवात झाली,
“आई तुझ्या मूर्तीवानी या जगात मुर्ती नाही
अनमोल जन्म दिला गं आई तुझे उपकार फिटणार नाही!”
वर्गात सर्वदूर शांतता पसरली होती. मुलांच्या डोळ्यात माया दाटून आली होती. हमसून हमसून रडणारी मुलं पाहून मी कविता थांबवली. प्रेमाने विचारलं, “काय झालं रे?”
तेव्हा ईश्वरी उभी राहिली. तिचा आवाज थरथरत होता.
“सर माझी आई लहानपणीच मला सोडून गेली.”
तिच्या डोळ्यांत साचलेलं दु:ख शब्दांत ओघळलं.
प्रवीण शांत बसला होता. तोही रडत होता. चौकशी केली तेव्हा कळलं की त्याचे आई-वडील दोघेही नाहीत.लहानपणीच त्याला ते सोडून गेलेत. आईच्या कवितेत त्याला आपल्या आयुष्याची पोकळी दिसली.
काही मुलांचे आई-वडील सध्या ऊसतोडीला गेले आहेत. त्यांना आईची आठवण येत होती.
“सर, आई दोन महिन्यांपासून घरी नाही. ती कधी येईल?”
या प्रश्नात त्यांची तगमग होती. मी पार ढासळलो. अश्रू आवरेनासे झाले होते. आणखी काही मुलं म्हणाली, “सर, जर आईच नसली तर कसं होतं ना?” त्या कल्पनेनेच त्यांना रडू येत होतं.
त्या क्षणी वर्ग हा केवळ शिकण्याचा भाग राहिला नव्हता; तो एक भावनिक कुटुंब बनला होता. प्रत्येकाच्या मनात ‘आई’ या शब्दाभोवती आपापली कहाणी होती. कुणाची अपूर्ण, कुणाची तुटलेली, कुणाची दूर गेलेली तर कुणाची आठवणीत जगणारी. सारा वर्ग आज दाटलेल्या जगात होता.
मुलांना जवळ घेत त्यांना म्हणालो, “बरं रे पोरांनो, आई म्हणजे फक्त जन्म देणारी स्त्री नाही. जी आपल्यावर माया करते, काळजी घेते, प्रेम देते तीही आईच असते. कधी आजी, कधी काकू, कधी शाळेतील शिक्षिका आपण एकमेकांचीही काळजी घेऊ शकतो.”
या उत्तराने पोरांचं समाधान होणारं नव्हतं पण अयशस्वी प्रयत्न करत होतो. त्या चर्चेतून मुलांनी मन मोकळं केलं. रडणं हळूहळू शांत झालं पण त्या दिवशी शिकवलेली कविता केवळ शब्द राहिली नाही. ती मुलांच्या जिव्हाळ्याची जाणीव बनली.
त्या दिवशी मला पुन्हा उमगलं वर्गात आपण फक्त धडे शिकवत नाही तर जखमा समजून घेतो, भावना जपतो आणि प्रेमाची उब देतो. मुलांच्या मनातील वेदनेचे औषध होतो.
आईवरची कविता संपली पण ‘आई’ या शब्दाने मुलांच्या मनातला कोवळा भावविश्वाचा दरवाजा उघडून ठेवला होता. या अचानक निर्माण झालेल्या प्रसंगातून शिक्षणाचा खरा अर्थ अधिक स्पष्ट झाला होता. शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील धडे नव्हेत तर मुलांच्या मनातील भावना समजून घेणं, त्यांना व्यक्त होण्यासाठी सुरक्षित अवकाश देणं आणि जीवनमूल्यांची जपणूक करणं होय. ‘आई’ या विषयाने वर्गात उमटलेली वेदना ही बालमानसशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाची आहे; कारण प्रत्येक मूल आपल्या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर शिकत असतं. काहींच्या आयुष्यातील पोकळी, काहींची तगमग तर काहींची भीती हे सगळं त्यांच्या भावविश्वाचा भाग असतं. अशा वेळी शिक्षकाची भूमिका केवळ ज्ञानदात्याची राहत नाही तर तो संवेदनांचा आधारवड ठरतो.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्येही शिक्षण प्रक्रियेत सामाजिक, भावनिक शिक्षण, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापन यावर भर दिला आहे. वर्गात निर्माण झालेला हा अनुभव मुलांना सहानुभूती, करुणा, परस्पर समजूतदारपणा आणि कृतज्ञता ही जीवनमूल्ये शिकवणारा ठरला. त्यांनी एकमेकांच्या वेदना ऐकल्या, समजून घेतल्या आणि ‘आई’ या शब्दाच्या पलीकडील मायेचा अर्थ शोधला.
त्या दिवशी शिकवलेली कविता अभ्यासक्रमाचा भाग होती; पण त्या तासाने मुलांच्या अंतर्मनाशी जोडलेलं शिक्षण दिलं. अशा क्षणांतूनच शाळा ही केवळ ज्ञानाची संस्था न राहता संस्कारांची, समजुतीची आणि माणुसकीची पाळणाघर ठरते आणि तेव्हाच जाणवतं खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणजे मनांना स्पर्श करणारी, जीवनाला दिशा देणारी एक संवेदनशील प्रक्रिया आहे.
तो तास संपला पण त्या हळव्या क्षणांनी शिक्षक म्हणून माझ्या मनात कायमचा ठसा उमटवला.
- भरत पाटील
9665911657
प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक (१३ ते १९ एप्रिल २०२६)
.jpg)



Comments