जातीभेद
- Apr 5
- 3 min read
गावाचं नाव होतं सोनवाडी. हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेलं, सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागं होणारं आणि संध्याकाळी मंदिरातील घंटानादाने शांत होणारं. बाहेरून पाहिलं तर हे गाव जणू एखाद्या चित्रासारखं सुंदर दिसायचं! पण त्या सौंदर्याच्या आत एक न दिसणारी रेषा होती -जातीची रेषा! त्या गावात दोन मुले वाढत होती. विठ्ठल आणि समीर. दोघंही एकाच वयाची, एकाच शाळेत शिकणारी, एकाच मैदानावर खेळणारी! पण तरीही त्यांच्या आयुष्यांमध्ये एक अदृश्य भिंत होती. विठ्ठल हा गावातील सवर्ण कुटुंबात जन्मलेला. त्याचे वडील शेतकरी होते आणि गावातील मानाचे माणूस म्हणून ओळखले जायचे. समीर मात्र गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या वस्तीत राहायचा. त्याचे वडील मजुरी करत आणि आई गावातल्या घरांमध्ये कामाला जायची. शाळेत दोघंही एकत्र बसायचे, एकत्र हसायचे. शिक्षकांच्या नजरेत ते फक्त विद्यार्थी होते पण शाळेच्या भिंतीबाहेरचं जग वेगळं होतं.
एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत विठ्ठलने समीरला घरी बोलावलं. दोघांनी दिवसभर खेळायचं ठरवलं होतं. समीर आनंदाने तयार झाला पण जेव्हा तो विठ्ठलच्या घराच्या दाराशी पोहोचला तेव्हा त्याच्या पायांनी पुढे जायला नकार दिला. आतून विठ्ठलची आई बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक क्षण स्मित होतं पण लगेच ते बदललं.
“कुठून आलास?” तिने विचारलं.
समीरने नाव सांगितलं. क्षणभर शांतता पसरली. “विठ्ठल बाहेर खेळायला येईल,” ती म्हणाली आणि दरवाजा हळूच बंद झाला. त्या दिवशी विठ्ठल बाहेर आला पण घरात येऊ न दिल्याचं कारण त्याला समजलं नाही. त्याच्यासाठी समीर फक्त मित्र होता. काही दिवसांनी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन होतं. शिक्षकांनी एक नाटक ठेवायचं ठरवलं समानता. त्यात मुख्य भूमिका समीरला मिळाली. तो खूप आनंदी होता. विठ्ठलनेही त्याला मदत केली.
नाटकाच्या दिवशी सगळं गाव जमलं होतं. समीर रंगमंचावर उभा राहून म्हणाला, “माणसाला त्याच्या कर्माने ओळखलं पाहिजे, जन्माने नाही.”
प्रेक्षकांमध्ये काहींनी टाळ्या वाजवल्या पण काहींच्या चेहऱ्यावर नाराजी होती. नाटक संपलं. सगळे घरी गेले! पण दुसऱ्या दिवशी गावात कुजबूज सुरू झाली. त्या मुलाला एवढी मोठी भूमिका कशी दिली? मर्यादा पाळायला हव्यात. हळूहळू समीरच्या कुटुंबावर दबाव वाढू लागला. त्याच्या वडिलांना काम मिळणं कमी झालं. आईला काही घरांतून कामावरून काढण्यात आलं. विठ्ठलला हे सगळं समजत नव्हतं. एके दिवशी त्याने वडिलांना विचारलं, “समीर वाईट आहे का?”
वडील थोडा वेळ शांत राहिले. “वाईट नाही पण आपल्यासारखा नाही.”
“का?”
त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं! पण परंपरा होती आणि त्या परंपरेचं ओझं ते स्वतःही वाहत होते. गावात एक विहीर होती, जिथून सगळे पाणी भरायचे! पण समीरच्या वस्तीतल्या लोकांना तिथून पाणी भरायला मनाई होती. त्यांच्यासाठी वेगळी, लांबची विहीर होती. एकदा दुष्काळ पडला. ती दूरची विहीर आटली. समीरची आई गावाच्या मुख्य विहिरीकडे गेली. तिच्या हातात रिकामा घडा होता. ती पाणी भरायला वाकली, इतक्यात कुणीतरी ओरडलं, “थांब!”
गावातले काही लोक जमा झाले. “ही विहीर सगळ्यांसाठी नाही!”
समीर तिथेच उभा होता. त्याच्या डोळ्यांत भीती आणि अपमान दोन्ही होते. विठ्ठलही तिथे आला. त्याने आईकडे पाहिलं. मग गावकऱ्यांकडे. “पाणी सगळ्यांसाठी असतं,” तो म्हणाला.
क्षणभर शांतता पसरली. काहींनी त्याच्याकडे रागाने पाहिलं.
“तू लहान आहेस, तुला समजणार नाही,” कुणीतरी म्हणालं पण त्या दिवशी विठ्ठलने स्वतः पाणी भरून समीरच्या आईच्या घड्यात ओतलं. तो छोटा क्षण होता पण मोठी रेषा हलली. काळ गेला. दोघं मोठी झाली. समीरने खूप कष्ट करून शिक्षण पूर्ण केलं आणि शहरात नोकरी मिळवली. तो अधिकारी झाला. विठ्ठलनेही शेती सांभाळत गावातच राहण्याचा निर्णय घेतला. वर्षांनंतर समीर परत गावात आला. आता तो वेगळा दिसत होता. आत्मविश्वासाने भरलेला. गावात त्याचं स्वागत झालं कारण आता तो मोठा माणूस झाला होता.
गावात नवीन पाणी प्रकल्प उभारायचा होता. समीरला त्यासाठी मदत करायला बोलावलं गेलं. त्याने गावाच्या नकाशावर बोट ठेवलं आणि म्हणाला, “पाणी सगळ्यांना समान मिळालं पाहिजे.”
त्या वेळी कुणी विरोध केला नाही. काम सुरू झालं. नवीन जलटाकी उभी राहिली. पाणी आता प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार होतं,जातीभेदन करता. उद्घाटनाच्या दिवशी समीरने भाषण केलं. “मी इथलाच आहे. या गावाने मला शिकवलं वेदना काय असते ते! पण त्याच गावाने मला मैत्रीही दिली. त्याने विठ्ठलकडे पाहिलं.जातीभेदही फक्त परंपरा नाही, ती मनातली भिंत आहे. ती भिंत आपणच बांधतो आणि आपणच तोडू शकतो.”
गावात शांतता पसरली. त्या दिवशी पहिल्यांदा गावातील सगळे लोक एकाच रांगेत उभे राहून पाणी भरत होते. कोणाच्या हातात घडा, कोणाच्या हातात बादली! पण आता त्या हातांमध्ये फरक नव्हता. सोनवाडी बाहेरून आधीही सुंदर होतं पण आता आतूनही ते बदलत होतं आणि त्या बदलाची सुरुवात झाली होती एका छोट्या प्रश्नाने. का?
- मयूर बागुल
+91 9096210669
प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक ६ ते १२ एप्रिल
.jpg)



Comments