वृद्धाश्रमातील पालक
सकाळचे कोवळे ऊन हळूहळू अंगणात उतरू लागले होते. वृद्धाश्रमाच्या जुन्या, फिकट भिंतींवर ते ऊन जणू काही हलकेसे हसू उमटवत होते. अंगणातल्या मोगऱ्याच्या झाडावरून मंद सुगंध दरवळत होता पण त्या सुगंधातही एक उदास शांतता मिसळलेली होती. त्या अंगणातल्या लाकडी बाकावर शांतपणे बसले होते शंकरराव. त्यांच्या हातात जुन्या आठवणींनी भरलेली एक डायरी होती पण आज ते काही लिहीत नव्हते. ते फक्त पानं उलटत होते. जणू काही काळ मागे फिरवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या बाजूलाच बसली होती सरस्वतीबाई, त्यांची जीवनसाथी. दोघांचेही केस पांढरे झाले होते, चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या पण डोळ्यांत अजूनही एकच प्रश्न होता, आपण इथे का आहोत?
कधीकाळी हे दोघे एका गजबजलेल्या घराचे आधारस्तंभ होते. त्यांच्या छोट्याशा घरात हसण्याचे, बोलण्याचे, खेळण्याचे आवाज सतत घुमत असत. त्यांचा मुलगा अमोल घरभर पळत असे. कधी आईच्या पदराला धरून उभा राहत असे तर कधी वडिलांच्या खांद्यावर बसून जग पाहत असे. शंकररावांनी आयुष्यभर मेहनत केली. लहानशा सरकारी नोकरीतून त्यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण दिले. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून त्यांनी अमोलच्या स्वप्नांना पंख दिले. सरस्वतीबाईनेही संसारासाठी खूप त्याग केला. स्वतःचे आजार, थकवा, सगळं लपवून त्या घर सांभाळत राहिल्या. अमोलचा अभ्यास, त्याचे खाणे-पिणे, त्याचे मित्र, त्याचे भविष्य हाच त्यांचा श्वास होता.
काळ पुढे सरकत गेला. अमोल मोठा झाला, शिकला, परदेशात नोकरी मिळवली. घरात आनंदाची लाट उसळली. शंकररावांनी सगळ्यांना अभिमानाने सांगितले, ‘माझा मुलगा मोठा अधिकारी झाला!’ लग्न झाले. सुनेचे स्वागत घरात झाले. काही दिवस सगळं छान होतं पण हळूहळू घरातल्या हसण्याचा आवाज कमी होऊ लागला. सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. सरस्वतीबाईंच्या जुन्या सवयी सुनेला खटकू लागल्या. शंकररावांचे सल्ले अनावश्यक वाटू लागले. “बाबा, आता काळ बदलला आहे,” अमोल म्हणायचा. “आई, तुम्ही इतकी काळजी करू नका,” तो हसून सांगायचा पण त्या शब्दांमध्ये एक दुरावा होता.
एके दिवशी अमोलने शांतपणे सांगितले, “बाबा, आई आम्ही दोघेही नोकरीत खूप व्यग्र असतो. तुमच्यासाठी एक चांगली व्यवस्था केली आहे. तिथे तुमची योग्य काळजी घेतली जाईल.” त्या ‘व्यवस्थे’चे नाव होते वृद्धाश्रम.
त्या दिवशी सरस्वतीबाईंच्या हातातून पाण्याचा ग्लास निसटून पडला होता. शंकरराव काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त मुलाकडे पाहिले, ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्य घालवले होते. आज ते दोघे त्या वृद्धाश्रमात होते. तिथे सगळ्यांचीच कहाणी जवळजवळ सारखी होती. कुणाला मुलाने सोडले होते, कुणाला मुलीने. कुणाला स्वतःच्या घरात जागा नव्हती तर कुणाला वेळ नव्हता. दुपारच्या जेवणानंतर सरस्वतीबाई नेहमीप्रमाणे खिडकीत उभ्या राहत. त्या रस्त्याकडे पाहत राहायच्या. “आज येईल का अमोल?” त्या हलक्या आवाजात विचारायच्या. शंकरराव नेहमीप्रमाणे हसत म्हणायचे, “हो! कधीतरी येईल!” पण त्या ‘कधीतरी’चा दिवस अजून आला नव्हता.
एके दिवशी वृद्धाश्रमात छोटा कार्यक्रम आयोजित केला होता. काही शाळकरी मुलं भेटायला आली होती. त्यांनी गाणी म्हटली, कविता सादर केल्या. त्यातल्या एका लहान मुलाने आईवर कविता म्हटली. सरस्वतीबाईंचे डोळे भरून आले. त्यांच्या मनात आठवणींचा पूर आला. अमोल लहान असताना ‘आई’ म्हणत त्यांना मिठी मारायचा. कार्यक्रमानंतर ती मुलं वृद्धांशी बोलत होती. एक मुलगा शंकररावांजवळ आला आणि म्हणाला, “आजोबा, तुमचा मुलगा कुठे आहे?”
क्षणभर शंकरराव गप्प राहिले. मग हसून म्हणाले, “तो खूप मोठा झाला आहे. खूप दूर राहतो.”
त्या मुलाने सहज विचारले, “तो तुम्हाला भेटायला येतो का?”
शंकररावांच्या डोळ्यांत पाणी आले पण त्यांनी ते लपवले. “तो येईल” त्यांनी फक्त एवढेच म्हटले. त्या रात्री सरस्वतीबाई झोपल्या नव्हत्या. “आपण काही चूक केली का?” त्यांनी विचारले. शंकरराव शांत होते. “आपण त्याला खूप प्रेम दिलं म्हणूनच का तो आपल्यापासून दूर गेला?”
त्या प्रश्नाचे उत्तर शंकररावांकडे नव्हते. फक्त शांतता होती.
काही महिन्यांनी वृद्धाश्रमात फोन आला. अमोलचा होता. तो म्हणाला, “बाबा मला तुमची आठवण येते.”
शंकररावांच्या आवाजात कंप होता. “आम्हालाही येते, बाळा!”
त्या दिवशी पहिल्यांदाच सरस्वतीबाईंच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. काही दिवसांनी अमोल वृद्धाश्रमात आला. त्याने आई-वडिलांसमोर येऊन मान खाली घातली. “माफ करा. मी चुकीचा होतो.”
सरस्वतीबाईंचे डोळे भरून आले. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. पालक मुलांना कधी दोष देत नाहीत. त्या क्षणी वेळ जणू थांबली होती. वृद्धाश्रमाच्या अंगणात पुन्हा एकदा हसण्याचा आवाज घुमला; पण त्या हसण्यात एक खोल सत्य दडलेले होते. पालक कधीच वृद्ध होत नाहीत. ते फक्त वाट पाहत राहतात. त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या मुलांची आणि त्या एका क्षणाची ज्या क्षणी कोणी तरी पुन्हा ‘आई’ किंवा ‘बाबा’ म्हणून हाक मारेल.
- मयूर बागुल
.jpg)



Comments