अधिरा
- Mar 5
- 4 min read

कन्या तू सुंदरी, रम्या तू ईश्वरी
स्वकर्तृत्त्वाची घे धुरी, उत्तुंग तू घे भरारी
मुलगी झाली हो! काय करावे आता? कौमार्य सांभाळत विकास करावा की घाबरत न्यूनगंडास बळी पडावे? कळीचा जन्म झाला तर ती हळूहळू उमलू लागणार. तिचं उमलणं निसर्गत: मुक्त, बेबंद, सुगंधित, आत्मदंग असणार तसेच ते असावे यासाठी एक उत्तम माळीण तिची उत्तम निगा राखते. आपल्या घरी जन्मलेल्या मुलीबाबतही तसेच असावे, नाही का? मुलीची आई हीच मुलीची सुजाण माळीण आणि वडील म्हणजे संवेदनशील माळी बनायला हवेत. हो की नाही?
आदर्श पालकत्व आपोआप कळायला लागतं असं नव्हे तर आदर्श सृजनशील पालक व्हायला शिकावं लागतं. निरीक्षण, वाचन, संवाद, प्रशिक्षण, समुपदेशन असे अनेक मार्ग यासाठी उपलब्ध आहेत. पालकत्व ही एक अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. नोकरीत जसे प्रमोशन होऊन वरिष्ठ श्रेणी मिळाल्यावर जबाबदारी वाढते तसे ‘पालकतत्व’ ही आयुष्यातील श्रेणीवाढ आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्यातील चोवीस तासांच्या दिनक्रमातील काही तास बालसंगोपणास द्यावेच लागतात. ‘आई’ नोकरी करणारी असो वा गृहिणी तिचा प्रेमळ सहवास जन्मापासून साधारण दहा-अकरा वयापर्यंत हा मुलींना हवाहवासा असतो. त्यानंतर शरीरात भौतिक आणि रासायनिक बदल असे काही होतात की बुद्धी आणि मनाची चक्रं एकदम बदलायला लागतात. भावनांचा आवेग इतका बदलायला लागतो की तावडीतून सारखा-सारखा सुटायला लागतो. कधीकधी आई मुलीस एकदम परकीच भासायला लागते. कधी कधी प्रतीस्पर्धी वाटायला लागते तर कधी कधी मठ्ठ, ओल्ड फॅशन्ड वाटायला लागते. श्रीदेवीचा इंग्लिश विंग्लिश चित्रपट बघितलाय का? अगदी त्यातील श्रीदेवीची मुलगी सपना कसे सतत आईच्या मनाविरुद्ध वागते, आईचा सतत अपमान करते, आईचं बिल्कुल ऐकत नाही. तर असे का होत असावे बरं? सतत आई आई करणारी
मुलगी एकदम असे कसे वागायला लागते? याला म्हणतात ‘इलेक्ट्रॉ कॉम्प्लेक्स’! सिगमंड फ्रायड या मानसशास्त्रज्ञाने ही संकल्पना सिद्ध केली होती. सिगमंड फ्रॉयडच्या सिद्धांतानुसार हे कॉम्प्लेक्स मुला-मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या ‘फॅलिक टप्प्यात’ विकसित होते. साधारण पाच-सहा वर्षापासून पुढे मुलगी जसजशी मोठी होते, वयात येते तसतसे तिला वडिलांचे जास्त आकर्षण वाटते. त्यातून आईबद्दलचे आकर्षण कमी होते. केवळ कमी होत नाही, आईचा दुःस्वास वाटायला लागतो... कारण शरीरात अशा काही संप्रेरकं हार्मोन्सची निर्मिती होत असते त्याचा परिणाम
मनावर, विचार करण्यावर, भावनांवर होत असतो. अवचेतन मनात बरंच काही साठलेलं उफाळून येतं आणि त्याचा परिणाम दैनंदिन वागण्यावर होतो. याचे फार उत्तम उदाहरणांसह विश्लेषण अमेरीकन मानसशास्त्रज्ञ फ्राईड आणि कार्ल जंगच्या पुस्तकांतून वाचायला मिळते. पालकांनी वाचणे आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रमात याविषयी धडा असणे आवश्यक आहे. याविषयी
बालमानसशास्रीय तज्ज्ञांची समुपदेशनपर व्याख्याने शाळेत आयोजित करणे आवश्यक आहे.
ज्यामुळे मुला-मुलींना, पालकांना आपल्या अंतर्मनाचा शोध घेऊन वागण्यात संयमितपणा आणण्यात मदत होईल. अन्यथा अनाकलनीय, टोकाची वृत्ती सुद्धा बळावते व अघटित घटना सुद्धा आजुबाजूला कुटुंबात घडत असतात. सामाजिक, कौटुंबिक दडपणामुळे कुठेही वाच्यता न करता ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असे धोरण घेतले जाते. ‘इडीपस कॉम्प्लेक्स’बद्दल आपल्याकडे फार सजगता नाही. त्यामुळे मुली-मुले पौगंडावस्थेत अशी का वागतात याचे गूढ पालकांना, शिक्षकांना कळत नाही. नीट निरीक्षण केल्यास लक्षात येते, या वयात मुलींचे आईबद्दलचे वागणे हळूहळू बदलू लागते. मुली आईशी उद्धटपणे आणि वडिलांशी प्रेमळ, लाडीकपणे वागू लागतात. यातील मानसशास्रीय विज्ञान पालकांना माहीत नसल्यामुळे याविषयी आपल्याकडे त्या वयातील म्हणजे साधारणत: तीस ते पस्तीस वयात आलेल्या पालकांना
मुलींच्या वागण्यातील बदलामागचे कारण लक्षात येत नाही आणि त्यामुळे अतिशय कठीण मानसिक अवस्थेतून दोघेही जातात. खरं तर आई ही सर्वच दृष्ट्या
मुलीपेक्षा मोठी असते त्यामुळे सामंजस्याची अपेक्षा आईकडूनच जास्त असते पण आपल्या मुलीच्या वागण्याचे बदललेले स्वरूप बऱ्याच आया स्वीकारुच शकत नाहीत कारण त्यावेळी आईच्याही शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे डॉक्टर सांगतात दोन्हीकडेही तवा तापलेला आहे, सबुरीने घ्यावे. होमिओपॅथिक औषधेही यावर गुणकारी ठरतात पण कुटुंब डॉक्टरांकडे गेले तर!
स्वतःच्याच मनाने चुकीचे अर्थ काढून मुलीला टोमणे मारणे, शारीरिक इजा करणे, जास्तीत जास्त घरकाम करायला लावणे, संवादाचे रुपांतर भांडणात होणे असे घरांघरांमध्ये कुटुंबामध्ये दिसते. मुली स्वतःच्या वाढत्या वयात होणाऱ्या शारीरिक, मानसिक बदलामुळे आधीच त्रस्त असतात आणि त्यात आईचे हे बदललेले रूप बघून, अनुभवून आणखी जास्त द्वंद्व निर्माण होते.
प्रत्येक आई आणि मुलीच्या आयुष्यात एक काळ असा येतो की आईच जन्मदात्या मुलीस स्वतःची प्रतिस्पर्धी, सवत समजू लागते पण ती एक प्रकारची सुसुप्ती अवस्था असते. ती अवस्था काही वर्षाच्या कालावधीनंतर संपते म्हणजे उत्तम मानसिक आरोग्य असणाऱ्या आई-मुलीचं नातं हे या कॉम्प्लेक्समधून साधारण 2-3 वर्षांमध्ये पूर्ववत होतं आणि पुन्हा एकदा आई-मुलीचे विश्व बनते आणि मुलगी आईचे संपूर्ण जग असते पण मानसिक आरोग्य निकोप नसेल तर मात्र हा कॉम्प्लेक्स आयुष्यभरही मनात राहू शकतो. यातून अनेक मानसिक व शारीरिक समस्या उद्भवू शकतात.
राधा (वय बारा) : आई तुला नीट भाषा बोलता येत नाही, नीटनेटकं राहता येत नाही.
आई : तू मला शिकव आता कसे बोलायचे, कसे राहायचे! मोठी झालीस ना! शिंगे फुटलीत तुला. राधा : माझ्या टीचर्स बघ किती छान राहतात, छान बोलतात. तू येऊच नकोस शाळेत. एका ठरावीक वयात असा वाद-विवाद अनेक घरांमध्ये आई-मुलीमध्ये नित्य चालतो. हे जाणीवपूर्वक घडत नाही. अजाणतेपणाने भावनांवरचा ताबा निसटतो. का होते, कसे होते कळत नाही. यालाच
हार्मोनल बदल म्हणतात. या बदलांमुळे अनेक मानसिक व शारीरिक समस्या उद्भवतात. त्यावर उपाययोजना उपलब्ध आहेत पण त्या उपाययोजना करून घेणाऱ्यांची संख्या समाजात एक टक्का सुद्धा नाही. त्यामुळे नात्यात प्रेमळ संबंध प्रस्थापित करण्यात अनेक अडचणी येतात. हे अमान्य केलंत तरी कटू सत्य आहे. यावर कोणीही बोलत नाहीत.
खलील जिब्रान या लेबनान लेखकाने साधारण दोनशे वर्षांपूर्वी लिहिलेली एक रुपककथा उदाहरणादाखल देते. एका स्त्रीचे लवकर लग्न झाल्यामुळे तिला झालेली मुलगी वयात येते तेव्हा ती आईच्या बरोबरीची वाटते. दोघी सुंदर, उंच, सडपातळ पण सुबत्तेमुळे जरा बाळसेदार... दोघींची आवड निवड सारखीच असते. दोघींचे एकमेकींवर फार प्रेम असते. दोघींनाही एकसारखीच झोपेत चालण्याची सवय असते. झोपेत चालण्याचा आजारच असतो तो! पण दोघींनाही तो झोपेत चालण्याचा आजार होता.एका रामप्रहरी थंडीच्या प्रातःकाळी, त्या दोघीही झोपेत चालत बागेत गेल्या, फूलझाडांमधून फिरू लागल्या. असा बराच वेळ गेला आणि त्या एकमेकींसमोर आल्या. आईने मुलीचा गळा धरला अन् फाटक्या आवाजात ती म्हणाली, “तू वैरीण इथे का आलीस? अगंऽऽ
माझ्याकडे बघ, माझे सारे तारूण्य तू शोषून घेतलेस. माझा जीवनरस तू तुझ्याकडे वळवलास, माझे कौमार्य भंग करून तू कुमारीका म्हणवून सर्वत्र मिरवतेस. माझे रूप घेऊन तू मला दुय्यम केलेस. आता तुझे प्राण घेतल्याशिवाय मी तुला सोडणार नाही...”
मुलीने त्वेषाने आईचा गळा धरला. ती चित्कारली “बरं झालं आज तू भेटलीस. आज मी तुला जीतं सोडत नाही. दुष्टे माझ्याकडे बघ. बघ मी म्हणजे तुझी प्रतिकृतीच! मला माझं अस्तित्वच नाही. मला स्वतंत्र आवड नाही, निवड नाही, विचार सुद्धा नाही. जिथं तिथं तूऽऽ तूच माझ्या अस्तित्वात जाणवतेस. आता तुझे आजार सुद्धा माझ्यात उतरतील! नाही नाही... आज मी तुला जीत्तं सोडणार नाही!” दोघी एकमेकींचा गळा धरू लागताच पहाट होते. कोंबडा आरवतो. दिशा सजतात. दोघी दचकून जाग्या होतात. आई मुलीला कुशीत ओढत, कुरवाळत विचारते, “बेटा इतक्या सकाळी तू बागेत काय करतेस? थंडी बांधेल ना, चल आत चल.”
मुलगी आईला बिलगत म्हणते, “चल आई, आत चल! तुला थंडी अजिबात सोसत नाही. आधी ती शाल नीट गुंडाळून घे. मी चहा टाकते....”
पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक चपराक २ ते ८ मार्च २०२६
विजयालक्ष्मी मणेरीकर
9822683799
.jpg)



Comments