top of page

संपादकीय : हडळीला नाही नवरा आणि खवीसाला नाही बायको!

  • 4 hours ago
  • 4 min read

‌‘भारतीय राजकारणाच्या अविश्वासाचे जनक‌’ अशी ओळख असलेल्या शरद पवार यांच्या आठ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. विविध विकासकामासंदर्भात ही भेट घेतल्याचे या पक्षाकडून सांगण्यात येत असले तरी राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गट मतदारसंघ पुनर्रचना विधेयक  पुन्हा संसदेत मांडले तर एनडीएला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. ‌‘देशात कोणीही कुणालाही भेटू शकतं. पंतप्रधानांना भेटून आपल्या मतदारसंघातील कामे करून घेण्यात गैर काय? मुख्यमंत्री या नात्यानं मलाही विरोधी पक्षातील अनेक जण भेटून त्यांच्या अडचणी सांगत असतात,‌’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.



कोणीही कोणालाही भेटू शकतं, हे फडणवीसांचं म्हणणं अगदी रास्त असलं तरी कोणीही कोणासोबतही जाऊ शकतं, हे सुद्धा सध्याच्या राजकीय परिस्थितीत वास्तव आहे. माजी मुख्यमंत्री आणि अभ्यासू नेते अशी ओळख असलेले पृथ्वीराज चव्हाण या भेटीबाबत म्हणाले की, ‌‘मी जरी विरोधी पक्षात असलो तरी सत्ताधारी पक्षातील अनेक नेते मला सांगतात की पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही फोडणार!‌’ असं जर असेल तर मग सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली या आठ खासदारांचं मोदींना भेटणं हे फक्त मतदारसंघाच्या ‌‘पॉलिसी मेकिंग‌’ संदर्भापुरतं मर्यादित राहत नाही.


गेल्या काही काळात पंतप्रधान मोदी यांनी डीएमसीतून फुटलेल्या वीस खासदारांची भेट घेणं असेल, शिवसेनेच्या खासदारांची भेट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या या खासदारांची भेट असेल या प्रत्येक घटनेवरून तर्कवितर्क लावले गेले. आपल्या कन्येच्या भल्यासाठी पवार काहीही करू शकतात, असे सांगितले जात आहे. तसे जर काही विपरित घडलेच तर पवारांच्या उतरत्या काळात त्यांची जी काही थोडीफार अब्रू आहे, तिही संपुष्टात येईल. देशभर विद्यार्थी आंदोलन पेटलेले असताना अभिजित दिपकेची भेट घेणे, त्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून येणे, त्या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळणे, पंतप्रधान कार्यालयातून त्याबाबत समाजमाध्यमांवर बातमी आल्यानंतर ‌‘आपण पंतप्रधानांना विद्यार्थ्यांशी संवाद साधायला सांगितल्या‌’चे सांगणे या सगळ्यातून पवारांचे ‌‘मरेपर्यंत राजकारण‌’ हे नेहमीचे धोरण दिसून येते. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मोदींना भेटायला गेल्यावर पंतप्रधानांनीही आधी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांची कार्यशैली आणि ऊर्जा याचे कौतुक केले.


गेले पंधरा दिवस विरोधी पक्षांनी गोंधळ घालत सभागृहाचे काम बंद ठेवल्याने पंतप्रधानांना आमच्या कामाची, समस्यांची माहिती द्यायला गेलो असं या खासदारांनी सांगितलं. मुळात तुम्ही सभागृहाचे काम बंद का ठेवता? हाच प्रश्न आहे. जे प्रश्न सभागृहात मांडायला हवेत त्यासाठी पंतप्रधानांच्या खासगी भेटी घेणं यातून यांची विकासकामांच्या दिखाव्याची तळमळ दिसून येते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न द्या, अशी मागणी पंतप्रधानांकडे केल्याचे हे खासदार सांगतात. सुरेश म्हात्रे म्हणाले, ‌‘मुंबई विमातळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी पंतप्रधांकडे केली.‌’ ‌‘उजणी धरणातून बीडला पाणी मिळावं‌’ अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली. ‌‘पुणे-नाशिक रेल्वे प्रश्नावर चर्चा केल्याचं‌’ अमोल कोल्ह्यांनी सांगितलं. या सगळ्या समस्या महत्त्वाच्या असल्या तरी पंतप्रधानांच्या भेटीचे ‌‘टायमिंग‌’ चुकले का? असा प्रश्न विचारला जात आहे.


गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात अनेक उलथापालथी घडल्या. एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेना हा पक्ष फोडला. त्या पाठोपाठ अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भगदाड पाडले. या सगळ्या फोडाफोडीच्या घटनांमुळे चर्चांना उधाण आले. ‌‘या वयात शरद पवारांना किती त्रास होत असेल?‌’ याच्या कहाण्या रंगवण्यात आल्या. यापूर्वी खुद्द पवारांनी मात्र काय प्रताप केले हे सहसा कोणीही सांगत नाही. शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठित खंजीर खुपसला. ज्या यशवंतराव चव्हाणांना ते आपला गुरू मानतात त्या यशवंतरावांपासून ते फुटून वेगळे झाले. शिंदेंनी जसं बंड केलंय तसंच काहीसं बंड त्याकाळी पवारांनी केलं. या कृतिमुळे दुखावल्या गेलेल्या, अतियश अस्वस्थ झालेल्या यशवंतराव चव्हाणांनी एक लेख लिहिला होता. भावनिक साद घालणाऱ्या त्या लेखाचं शीर्षक होतं, ‌‘या चिमण्यांनो परत फिरा रे...‌’ पवारांनी तो लेख वाचल्यावर ताबडतोब त्याला उत्तर दिलं. त्यांच्या प्रतिलेखाचं शीर्षक होतं, ‌‘परतीचे दोर केव्हाच कापून टाकलेत.‌’


आज हेच पवार आणि त्यांचे चमचे पक्षफुटीरून गळे काढतात. ‌‘करावे तसे भरावे हा नियतीचा नियम नियती न मानणाऱ्या पवारांना मानावाच लागेल,‌’ याची साक्ष देणाऱ्या अनेक घटना गेल्या काही काळात घडल्या. केवळ त्यांच्या वयाचा आदर राखत त्यांनी केलेल्या पापांवर बोलायचेच नाही, असे केले तर ते अन्यायकारक ठरेल. आज ज्या जातीय अस्मिता टोकदार झाल्यात, माणसा-माणसात जे भेद निर्माण झालेत त्याचे श्रेय पवारांकडे जाते. जातीय मेळाव्यांची सुरूवात करून त्यांनी कायम अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले. ब्राह्मण, मराठा, दलित, माळी, वंजारी, धनगर असे संघर्ष उभे केले. त्यांच्या या स्वार्थी धोरणांमुळे किती तरी पिढ्या बरबाद झाल्या. अजूनही त्यांच्या या खेळ्या थांबत नाहीत आणि त्यातून अशा गाठीभेटी सुरू राहतात. ‌‘कायम तेल लावलेला पैलवान‌’, ‌‘मैद्याचं पोतं‌’, ‌‘बारामतीचा म्हमद्या‌’ अशा तिखटजाळ शब्दात ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी कायम पवारांची निर्भत्सना केली त्यांचेच वंशज आज पवारांना गुरू मानतात, हा दुर्दैवी योगायोग म्हणावा लागेल.


शरद पवार एनडीएसोबत गेले तर कदाचित काहींना आश्चर्य वाटेल! पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ‌‘हडळीला नाही नवरा आणि खवीसाला नाही बायको‌’ अशी गत शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि ‌‘पार्टी विथ डिफरेंस‌’चा आव आणणाऱ्या भाजपची झालीय. आज देशात प्रबळ विरोधी पक्षच राहिला नाही. त्यामुळे काहीही करून सत्तेचे लाभ पदरात पाडून घ्यायचे आणि जेवढे घर भरून घेता येईल तेवढे भरायचे, असेच सर्वांचे धोरण दिसते. तत्त्व, मूल्ये, विचारधारा, बांधिलकी हे सगळे कोसो मैल दूर गेले. सत्तेत कोणीही असले तरी फार तर ‌‘दगडापेक्षा वीट मऊ‌’ इतकाच काय तो फरक! ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बळावर देशावर राज्य केले त्या ‌‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आता आम्हाला गरज नाही,‌’ असं सांगण्याइतपत भाजपची मजल गेली आणि तिथूनच खऱ्याअर्थी या पक्षाचे अधःपतन सुरू झाले. महाविकास आघाडीचे घटक शरद पवार यांच्यासारख्या बुजूर्ग नेत्याला आपला ‌‘बाप‌’ मानतात आणि दरवेळी तोंडघशी पडतात. पदावर असताना शरद पवारांनी कोणती कामे केली? यावर अनेकदा चर्चा होते. त्यांचे योगदान नाकारताही येत नाही! पण त्यामुळे त्यांच्या चुकांकडे दुर्लक्षही करता येणार नाही. ‌‘मोदी किंवा पवारांचे फोटो नोटांवर छापा‌’ अशी मागणी करण्यापर्यंत या दोन्ही पक्षात त्यांचे त्यांचे लाभार्थी भक्त आहेत. कदाचित हे घडूही शकतं. मागे एकदा बाळासाहेब ठाकरे यांना विचारलं गेलं होतं की, ‌‘छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नोटांवर छापायला हवा का?‌’ त्यावेळी ते क्षणाचाही विलंब न करता म्हणाले होते, ‌‘कशाला? या नोटा कुठं कुठं चालतात ते बघितल्यावर तिथं गांधीच ठीक आहे. महाराजांना हे सहन होणार नाही.‌’ म्हणूनच नोटांवर पवार किंवा मोदी आले तरी आश्चर्य वाटणार नाही. आपण ‌‘देश‌’ म्हणून मात्र कमी पडतोय, हे सातत्यानं विविध घटनांतून दिसून येतंय आणि हे देशाला कमीपणा आणणारेच आपल्याला नैतिकता शिकवत असतात.


शरद पवार नेहमी सांगत असतात की, ‌‘आम्ही राजकारणी आहोत, संत नाही. त्यामुळे संतासारख्या अपेक्षा आमच्याकडून ठेवू नका!‌’ इतकी स्पष्ट भूमिका मांडूनही पवारांचे खासदार मोदींना भेटले म्हणून चर्चा होत असेल आणि या दोन्ही नेत्यांकडून, त्या दोघांच्याही पक्षांकडून आपण काही अपेक्षा ठेवत असू तर ती आपलीच चूक आहे. ‌‘तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे‌’ इतकेच तूर्तास आपल्या हातात आहे.


घनश्याम पाटील

७०५७२९२०९२

साप्ताहिक चपराक - १० ते १६ ऑगस्ट २०२६

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page