ज्योतिरादित्य शिंदे यांना महाराजा यशवंतराव होळकर राष्ट्रगौरव पुरस्कार
- Apr 5
- 2 min read
दिल्ली : महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 250 व्या जयंती वर्षानिमित्त विशेष ‘महाराजा यशवंतराव होळकर राष्ट्रगौरव पुरस्कार’ भारत सरकारचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य माधवराव शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे. सरहद संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.
या पुरस्कारासाठीची निवड डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एकमताने केली असून समितीत महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे संजय सोनवणी, प्रकाश खाडे यांचा समावेश होता. समितीने हा निर्णय घेताना शिंदे घराण्याने होळकर घराण्याच्या खांद्याला खांदा लावून मराठेशाहीचा उत्तरेत विस्तार करण्यात बजावलेल्या मोलाच्या कामगिरीचा सन्मान यांचा विचार केला आहे. मराठा इतिहासात शिंदे आणि होळकर ही दोन घराणी अनेक निर्णायक प्रसंगी परस्पर सहकार्य, सामूहिक युद्धकौशल्य आणि राष्ट्रदृष्टिकोनाची प्रतीके होती.
इतिहासात राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांनी दिल्लीतील मराठा प्रभाव दृढ करण्यासाठी एकत्रित भूमिका बजावली; पुढे महादजी शिंदे यांनी मराठा मुत्सद्देगिरीला सर्वोच्च शिखरावर नेले; तर पानिपतपूर्व आणि पानिपतनंतरच्या अनेक लढायांत शिंदे-होळकर सहकार्याचे अनेक संदर्भ आढळतात. काही बखरींमुळे आणि नंतरच्या किरकोळ संघर्षांमुळे निर्माण झालेल्या गैरसमजांपलीकडे जाऊन या दोन घराण्यांच्या व्यापक ऐतिहासिक योगदानाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे.
छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंती वर्षात दिल्लीत सरहद संस्था आयोजित, महाराष्ट्र सदन-दिल्ली आणि मराठी भाषा विभाग-महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी शनिवार, दि. 11 एप्रिल 2026 रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या स्वातंत्र्यनिष्ठ परंपरेचा आणि शिंदे घराण्याच्या ऐतिहासिक राष्ट्रकार्यातील योगदानाचा सन्मान एकाच व्यासपीठावर होणे, हा राष्ट्रीय ऐक्याचा महत्त्वपूर्ण क्षण ठरणार आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकसभा सदस्य, संसदीय कार्यातील सक्रिय सहभाग, विविध केंद्रीय जबाबदाऱ्या आणि सध्या भारत सरकारचे केंद्रीय मंत्री म्हणून सार्वजनिक जीवनात सातत्य, शिस्त आणि कार्यक्षमतेची छाप निर्माण केली आहे. परंपरेचा अभिमान आणि आधुनिक राष्ट्रकार्यातील सक्रिय सहभाग यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत असल्याचे समितीने म्हटले आहे.
पुरस्कार वितरण समारंभ दिल्ली येथे महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती सरहद संस्थेचे समन्वयक लेशपाल जवळगे यांनी दिली.
प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक ६ ते १२ एप्रिल
.jpg)



Comments