top of page

डॉ राजेंद्र माने यांचा दिलखुलास विनोदी कथासंग्रह

  • Jun 14
  • 4 min read

गावची जत्रा भानगडी सतरा हा डॉक्टर माने यांचा कथासंग्रह नुकताच वाचला. 42 वर्षे वैद्यकीय पेशात राहूनही चिरतरुण राहिलेला आमचा हा लेखक मित्र! हेवा वाटावा इतका फर्मास विनोदी लेखन करतो. केवळ सात कथांची ही हिरवीगार सप्तपर्णी.


माने लिहीत नाहीत, द .मा.न सारखे हसत खेळत संवाद साधतात. वाचकांना रमवून कवेत घेतात. गर्दी खेचणाऱ्या दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेले हे लेखन कमालीचे वाचनीय आहे. विनोद हा माझा पिंड नाही, असे नम्रपणे सांगत ते वाचकांना विश्वासात घेतात. खमंग विनोदाची मेजवानी देतात.


‌‘प्रौढ शिक्षण‌’ ही अशीच भन्नाट कथा. प्राध्यापक हिंगमिरे मॅडम... चवळीच्या शेंगेसारख्या सडसडीत देखण्या. बाई नोकरी करून समाजकार्य करतात. नवरा घर सांभाळतो. वाघिणी जवळ बांधलेल्या कोकरासारखा राहतो. गावपुढारी चंद्राबाई तमासगिरणीचा सत्कार बाईंच्या हस्ते घडवून आणतात. बाईबरोबर फोटो काढतात. चंद्राबाईंची शिक्षणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रौढ शिक्षणाचा वर्ग सुरू करतात. आंबट शौकीन गावकर यांना आयती संधी चालून येते. नऊवारीतल्या ठुमकत चालणाऱ्या चंद्राबाईसाठी गाव प्रौढ शिक्षण वर्गात गर्दी करते. शेवटी गावातल्या संसारी बायका हिंगमिरे बाईंच्या दारात मोर्चा नेतात. प्रौढ शिक्षणाचा वर्ग बंद करायला लावतात.


मिरासदारी शैलीचा फार मोठा पगडा डॉक्टरांच्या कथांवर आहे. ‌‘पाटलाची मिटींग‌’मध्ये सुंद्रा तमासगिरीण भेटते. तिच्यासाठी वेडा झालेला पाटील नि पाटलांवर चिडणारी पाटलीन असा 50 वर्षांपूर्वीचा खेड्यातला त्रिकोण इथेही आढळतो. पाटलीन म्हणते माझ्या बापाच्या गोठ्यात दहा म्हशी होत्या. त्यावर पाटील म्हणतात, माहिती आहे मला त्यातलीच एक मला दिली. असे खटकेबाज संवाद व विनोद कथेत आढळतात. सुंद्रा तमासगिरणीला मुंबईला न्यायची स्वप्ने बघणारा पाटील नाईलाज म्हणून पाटलीनीलाही नेतो. एकाच हॉटेलमध्ये दोन मजल्यावर दोघींना ठेवतो.


पाटील नुसती धावपळ करतो. बाबुराव म्हणजे पाटलांचा पीए पाटलांना बर्फी खायला घालून त्यांची पळता भुई थोडी करतो. स्वतः सुंदराचा भोग घेतो. धोतर पिवळे झालेला पाटील अचानक आल्यावर बाबुराव बाथरूममध्ये लपतो. खटकेबाज संवादामुळे  कथा लक्षात राहते.


‌‘गावची जत्रा भानगडी सतरा‌’ ही कथा  भन्नाट आहे. जत्रेची गाव वर्गणी गोळा करणारा परश्या शेवंता तेलिणीवर मरतो. 35 शीच्या देखण्या तेलिणीवर तात्याही मरत असतो. बेनवाड परश्या नाचणाऱ्या पुरुषांचा तमाशा आणतो.. बायकी पोशाखातील जंगी पोरी परश्या  खुळ्या तात्याला फोटोतून दाखवतो. तात्या वेडा होतो. तात्याची बायको संशयाने पछाडते. तेलणीच्या घरात आपलाच नवरा हाय असा समज करून ती काठीने परशाच्या गुडघ्यावर मारते. इकडे गावकरी तमासगिरणीची छेड काढणाऱ्या तात्याला अंधारात झोडपतात. घरी आल्यावर बायकोही मारते. वर म्हणते, बाईचा नाद आणि गावभर वाद आता तरी शाणं व्हा!


नाट्यमय मांडणीला डॉक्टर माने महत्त्व देतात. कथेतील नाट्य टिकवतात. त्यांच्या या कथासंग्रहात ‌‘गावचिपभर आणि पुढारी मापटभर‌’ अशी स्थिती आहे. ‌‘डाव जिंकला‌’ ही एक अफलातून सुंदर कथा आहे. खानदानी हिंदकेसरी कुस्तीगीर कुटुंबात ताराबाई वाढतात. पदरात तोळा मासा सुभानराव नवरा म्हणून पडतो. दोघांना एकच मुलगा. त्याने पैलवान व्हावे असे ताराबाईंना वाटते पण मुलगा तमाशाचा फडात रमतो. तो तमासगिरणीशी लग्न करतो. इकडे ताराबाई जत्रेला कुस्त्यांचा फड आयोजित करून हिंदकेसरी वडिलांना बोलवायची स्वप्न पाहते पण घडते उलटेच. मुलगा तमासगीर मैनेला बायको करून घरात आणतो. घराण्यावरून वाद झडतो. “तमासगिराची पोरगी कुस्तीगीराच्या घरात आणलीस व्हय?” म्हणून ताराबाई पोरावर चिडते. मैना उलट उत्तर करताना म्हणते “असं लई पैलवान रात्री तमाशाच्या फडात बघितल्यात म्या. त्यांच्या लंगोटीच्या गाठी लई घट्ट नसत्यात. बाई बघितली की पागल होत्यात तुमचं पैलवान!”


सासूला ढकलून ती धडक वाड्यात शिरते. सासूला डोईजड होते. मुलगाही बायकोच्या ओंजळीनेने पाणी पितो. शेवटी वाद विकोपाला जाऊन श्रीपती आणि मैना वाडा सोडून निघून जातात. कथेचा शेवट अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. मैना सोनापूरकरीन त्याच गावात जत्रेला तमाशा लावते. सरपंचाची सून हे वगनाट्य लावते. हुशार ताराबाई बाजू पलटवते. आपल्या भाषणात लावणी नाचणं ही नटराजाची सेवा आहे, आमच्या सुनबाई आज लावणी नाचून देवाला सेवा वाहणार आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे म्हणत डाव जिंकणाऱ्या ताराबाई या सासूपेक्षा मुत्सद्दी राजकारणी वाटतात.


‌‘दारूबंदी‌’ ही कथा दीड हजार लोकसंख्या असलेल्या वेताळवाडीत घडते. मारत्याच्या दारूगुत्यावर सारं गाव गर्दी करतो. घरोघर बायका दारू पिणाऱ्या नवऱ्याबद्दल ओरडतात. गावात पोरांना कोणी पोरगी देत नाही. बायका एकत्र येतात, मोर्चा काढतात. भट्टी उद्ध्वस्त करतात. मारत्या पेदाड दिग्याला हाताशी धरतो. त्याला गरवार बाईचं सोंग घ्यायला लावून दारूचे फुगे पोटाला बांधून आणतो. हादऱ्यानं एसटीत दारूचा फुगा फुटतो. बायकांना वाटतं बाई बाळंत व्हायला आली पण दारूचा वास पसरतो. साऱ्या एसटीतल्या बायकांना कळतं हा पहिल्या धारेच्या दारूचा वास आहे. बिंग फुटल्यावर लुगडं नेसलेला दिग्या पांदीने पळत सुटतो. हा किस्सा नव्हे कुंडका आहे खास माने टच असलेला.


‌‘आमची शेअर बाजाराची मैत्री‌’ हा मात्र एक किस्सा आहे. शेअर बाजार ही भुलभुलय्यांची वेताळनगरी. सामान्य माणसे इथे फसली जातात. लेखक 100 शेअर विकत घेतो. 1000 रु घालवतो. दहा हजाराची स्वप्ने पाहतो. सगळं घर टीव्ही समोर बसते, श्रीमंतीची स्वप्ने पाहते. शेअर बाजाराचे दर कोसळतात. सारेच पैसे जातात. पूर्ण माहितीशिवाय कोणत्याच उद्योगात पडू नये ही शिकवण ही कथा देते.


डॉक्टर माने यांच्या कथातील पात्रे सामान्य मध्यमवर्गीय असतात. आपल्या छोट्या भावविश्वातीत स्वतःच्या हाताने मनस्ताप घडवून घेतात. ‌‘मी लग्नाला जातो‌’ या कथेतली पात्रेही तशीच आहेत. अक्का आपल्या बहिणीला मुलीच्या लग्नाची पत्रिका तीन आठवडे आधी पाठवते. बहिणीची धावपळ होते. मुंबईला जाणाऱ्या गाडीचे रिझर्वेशन करण्यासाठी फॉर्म भरताना नायकाची होणारी तारांबळ, अडचणीत टाकणारे हिंदी, साखरपुडा आणि लग्न एकाच वेळी असल्याने सामानाचे ओझे, जवळ दोन बँगा भरलेल्या. प्रवास बरा होतो पण वॉटर बॅग गाडीतच राहते. अमेरिकन डायमंडच्या बांगड्या घालणारी बायको आणि नटून थटून घागरा घालणारे कन्यारत्न. एकूण लग्न समारंभ छान होतो. जाताना दोन बॅगा असणाऱ्या कुटुंबाजवळ येताना सात बॅगा असतात. रात्रभर प्रवास करून पहाटे सारे घरी पोहोचतात. नर्म विनोदाची घटनानुरूप मांडणी या कथेमध्ये जाणवते. हा एक विवाह वृत्तांत आहे पण एकूण करमणूक प्रधान, कुरकुरीत, मसालेदार पण भन्नाट चवदार.


सगळा कथासंग्रह वाचनीय आहे. रसवंतीची जाण असणारा आस्वादक मात्र भेटायला हवा. डॉक्टर तुम्ही विनोदाच्या प्रांतात पहिल्या पुस्तकाने बाजी मारली. आमच्या गावाकडे याला पहिल्या दगडात पाडाचा आंबा पाडणे म्हणतात. तुम्ही तो पाडलात. ज्योती घनश्याम यांचे मुखपृष्ठ ही भन्नाट. ‌‘चपराक‌’ची वाङ्मय निर्मिती लाजबाब. सगळा मेळ कसा जमून आलाय. त्रिवार अभिनंदन!!


- प्रा. व. बा. बोधे

नीरा, ता. पुरंदर

750755 4054

साप्ताहिक चपराक १५ ते २१ जून २०२६


गावची जत्रा, भानगडी सतरा | Gavchi Jatra Bhangadi Satara
₹150.00₹112.50
Buy Now


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page