मौनातले इशारे : विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र आणि शिक्षकाची भूमिका - भरत पाटील | Educational Article
- 5 hours ago
- 3 min read
शाळेतील वर्ग हे विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला समजून घेण्याचे एक संवेदनशील व्यासपीठ असते. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. त्याच्या भावना, अपेक्षा आणि संघर्षही वेगळे असतात. काही विद्यार्थी आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करतात तर काहींच्या मनातले वादळ त्यांच्या मौनातूनच दिसून येते. अशा मौनातील इशाऱ्यांना ओळखणे ही शिक्षकाची खरी कसोटी असते.
अश्विनी ही वर्गातील एक शांत, अबोल विद्यार्थिनी. अभ्यासात मध्यम असली तरी तिच्या चेहऱ्यावर नेहमीच काहीतरी दडलेले जाणवत असे. दुसरीकडे, मानसीचे वेळोवेळी कौतुक होत होते. तिच्या यशामुळे वर्गात सकारात्मक वातावरण तयार होत होते; परंतु नकळतपणे अश्विनीच्या मनात तुलना आणि कमीपणाची भावना निर्माण झाली. ती हळूहळू स्वतःमध्येच गुंतत गेली. तिचे बोलणे कमी झाले, सहभाग घटला आणि तिच्या डोळ्यांत एक वेगळीच नाराजी दिसू लागली. हे जाणवत होते.
एके दिवशी तिच्याशी बोलावे म्हणून मी तिच्याजवळ गेलो. तिने अबोला धरला होता. पुन्हा पुन्हा बोलतं करण्याचा प्रयत्न करत होतो.
“जा सर, मला नाही बोलायचं तुमच्याशी,” अश्विनी अचानक बोलून गेली.
मी हसण्यावारी घेत म्हणालो, “काय गं बाई, काय झालं तुला?”
ती म्हणाली, “तुम्ही फक्त मानसीलाच प्रश्न विचारता, तिलाच कामं सांगता. मला नाही सांगत, हात वर केला तरी...”
“नाही गं, तसं काही नाही,” मी तिला शांतपणे समजावत होतो. ती खाली बसली, मान खाली घातली आणि डोळे मोठे करून रागाने पाहू लागली.
हे दृश्य मला आतून हलवून गेले. शिक्षक म्हणून हे बदल दुर्लक्षित करणे अशक्य होते. अनेकदा तिला प्रश्न विचारले, संवाद साधण्याचा प्रयत्न केला; पण ती उत्तर देत नव्हती. तिच्या मनातील कोलाहल शांत करणे ही खरी कसोटी होती. तिचे मौन जणू काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. पुन्हा एके दिवशी ठरवून तिच्याशी शांतपणे, कोणताही दबाव न आणता घराच्या गप्पा केल्या. सहज बोलत संवाद साधला. तिच्या मानसिक पातळीवर गेलो नि त्या वेळी तिच्या मनातील साचलेले भाव बाहेर येऊ लागले.
“माझे कोणी कौतुक करत नाही,” ही तिची खंत होती. तिच्या मनात निर्माण झालेली तुलना आणि न्यूनगंड तिला आतून कुरतडत होता.
विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती ही त्यांच्या शिक्षणप्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मन अस्थिर, खचलेले किंवा तणावग्रस्त असेल तर कितीही उत्तम अध्यापन केले तरी अपेक्षित परिणाम साध्य होत नाहीत. उलट, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण मन विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा देते. त्यामुळे आपण केवळ बौद्धिक प्रगतीवर लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजांकडेही संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे हे जाणवले. योग्य वेळी दिलेले प्रोत्साहन, समजून घेतलेला संवाद आणि सकारात्मक वातावरण यामुळे विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती सुदृढ राहते आणि त्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो.
विद्यार्थ्यांच्या भावनांना समजून घेणे तितकेच आवश्यक आहे, जितके त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे. प्रत्येक विद्यार्थ्याचे कौतुक होणे गरजेचे असते. कौतुक हे केवळ गुणांवर आधारित नसावे तर प्रयत्नांवर, प्रगतीवर आणि वैयक्तिक गुणांवरही असावे. अश्विनीसारख्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनाची, ओळखीची आणि समजुतीची गरज असते. हे यावेळी मला स्वतःला आत डोकावण्यास पुरेसे ठरले.
‘मौनातले इशारे’ ओळखण्यासाठी शिक्षकाने संवेदनशील आणि सजग राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, त्यांच्या वागण्यातले बदल, सहभागातील घट हे सर्व महत्त्वाचे संकेत असतात. योग्य वेळी या संकेतांची दखल घेतली तर अनेक समस्या वेळेवर सोडवता येतात; अन्यथा त्या पुढे मोठ्या स्वरूपात उभ्या राहू शकतात. ज्या मला अश्विनीच्या रूपातून सामोरे आल्या होत्या.
मित्रहो, शिक्षण ही केवळ ज्ञान देण्याची प्रक्रिया नाही तर विद्यार्थ्यांच्या मनाला आकार देण्याची एक जबाबदारी आहे. अश्विनीच्या मौनातील इशारे ओळखून तिच्याशी साधलेला संवाद तिच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देणारा ठरला. त्या दिवसापासून तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुलले आणि ती वर्गात सक्रिय झाली.
म्हणूनच, विद्यार्थ्यांचे मौन हे रिकामेपण नसते; ते काही तरी सांगत असते. त्या मौनातील इशारे ओळखले तरच शिक्षण खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि अर्थपूर्ण ठरते.
कधी कधी कोणीतरी कोणासाठी काही तरी खास ठरतो. त्यासाठी वय, नातं किंवा कोणत्याही बंधनांची गरज नसते. माणसांच्या भावविश्वात अशी काही नाती शांतपणे आकार घेत असतात; जी शब्दांत मांडली जात नाहीत पण त्यांच्या जाणिवा अतिशय खोलवर रुजलेल्या असतात. या भावनांचा उगम मनाच्या एका कोमल कोपऱ्यातून होतो, जिथे अपेक्षांपेक्षा समजूत आणि स्पर्धेपेक्षा सहानुभूती अधिक महत्त्वाची ठरते.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातही असा एक निःशब्द पण प्रभावी भावबंध निर्माण होऊ शकतो. एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात दडलेली वेदना, त्याची अस्वस्थता किंवा त्याच्या प्रयत्नांची घेतलेली दखल हे सर्व त्याच्यासाठी नात्यांच्या चौकटीपलीकडचा पण अत्यंत जिव्हाळ्याचा आधार बनतात. या ‘मौनातल्या’ इशाऱ्यांमधून जिथे शब्द कमी आणि भावना अधिक असतात त्यामुळे एक मनमोकळा, विश्वासाचा कोपरा तयार होतो.
या कोपऱ्याला कोणत्याही नात्याची मोहर लागत नाही; तो सहजपणे, नैसर्गिकरित्या फुलत जातो. शिक्षकाची एक छोटीशी दखल, कौतुकाची एक नजर किंवा योग्य वेळी दिलेला आधार विद्यार्थ्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. अशा नात्यांमधून दोन्ही बाजूंना सकारात्मक ऊर्जा मिळते. विद्यार्थ्याला आत्मविश्वास तर शिक्षकाला आत्मसमाधान मिळत असते.
म्हणूनच शिक्षणप्रक्रियेत वर्गातल्या ‘मौनातले इशारे’ अशा निःशब्द, नात्यांच्या चौकटीबाहेरच्या भावबंधांना स्थान देणे अत्यंत आवश्यक आहे; कारण हेच ते कोमल कोपरे असतात जिथून खऱ्या अर्थाने शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा सकारात्मक, अर्थपूर्ण प्रवास सुरू होत असतो.
-भरत पाटील
9665911657
प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक ८ ते १४ जून २०२६
.jpg)



Comments