जीवनातील दुःख आणि ज्ञानाचा प्रकाश | Osho Stories
- 6 hours ago
- 3 min read
माणसाच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी अस्तित्वात आहेत त्यातून अनेकदा दुःख वाट्याला येते. दुःख नष्ट करण्यासाठी आपण आनंद मिळत नाही अशी तक्रार सातत्याने करत असतो पण त्या तक्रारी करत असताना दुःख नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करण्याऐवजी आयुष्यात दुःख आहे म्हणून रडत बसतो; मात्र दुःख नष्ट होत नाही. रडत बसल्याने दुःखाची जाणीव होते मात्र आनंदाचे हळवे क्षण वाटायला येत नाहीत. जीवनामध्ये आपल्याला जे नको आहे, ते नष्ट करण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी आपण नवे नवे पर्याय शोधायला हवे असतात! मात्र त्यावरील उपाय शोधण्याऐवजी आहे त्याचाच विचार अधिक करतो आणि म्हणून दुःख आपल्या आयुष्यात कमी होत नाही. आयुष्यामध्ये आपण वेगळा विचार करायला शिकलो, यासंदर्भात चिंतन, मनन केल्याने अनेक प्रश्न आपोआप सुटायला सुरुवात होते. मुळात प्रश्न सोडवायचे असतील तर त्या संदर्भाने उत्तरे शोधायची असतात. केवळ चर्चा करून प्रश्न दूर करता येत नाहीत. आपण प्रश्नावर चर्चा करत राहतो मात्र उत्तरांचा शोध घेत नाही. म्हणून जीवनातील प्रश्न कायम उरतात. भगवान रजनीश या संदर्भाने एक कथा सांगतात. त्या कथेचा मतिर्थात जीवनातील दुःख, समस्या, प्रश्न दूर करण्यासाठी दृष्टिकोन देणारा आहे.
ओशो सांगतात, एका गावात एक माणूस राहत होता. त्याच्या जीवनात प्रचंड दुःख होते. तो सतत तक्रारी करायचा. त्यामुळे त्याचे सारे जीवन निराशेने भरलेले होते. तो नेहमी म्हणायचा, “माझ्या आयुष्यात फक्त अंधारच अंधार आहे. सुख, शांती आणि आनंद माझ्या नशिबातच अजिबात नाही.”
दररोज संध्याकाळी तो आपल्या घरात बसून अंधाराला दोष द्यायचा. अंधाराच्या अस्तित्त्वाने तो अनेकदा बेचैन व्हायचा. “हा अंधार किती भयंकर आहे! तो माझ्या घरात का येतो? सतत अंधाराच्या अस्तित्त्वाने निराशेच्या छायेत सापडायचा. तो येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला म्हणायचा, मी किती वर्षे त्याच्याशी झगडत आहे पण तो जातच नाही.”
एके दिवशी गावात एक ज्ञानी साधू पुरुष आले. त्या माणसाने त्यांना आपले दुःख सांगितले. तो म्हणाला, “महाराज, माझ्या घरात अंधार आहे. मी अनेक वर्षे त्याच्याशी लढतो आहे. त्याला शिव्या देतो, रागावतो पण तो जात नाही.”
साधूंनी विचारले, “तू अंधार घालवण्यासाठी काय केलेस?”
माणूस म्हणाला, “मी त्याच्यावर ओरडलो, त्याला शिव्या शाप दिले आहेत. अनेकदा अंधाराला काठ्यानी मारण्याचा प्रयत्न केला आहे. काठ्या फिरवल्या, भिंतींवर हात मारले पण अंधार काही केल्या देखील हटत नाही.”
साधू महाराजा त्याला म्हणाले, “तुझ्याजवळ असलेला अंधार निश्चित नष्ट होऊ शकेल मात्र मी तुला जे सांगतो आहे ते तू केले पाहिजे.”
इतके दिवस आपण अंधार नष्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत पण अंधार नष्ट होत नाही. हा साधुपुरुष आपल्याला जे काही सांगतो आहे, ते करून पाहिले त्याने अंधार नष्ट होणार असेल तर आपण करून पाहायला काय हरकत आहे? असे त्याला वाटले आणि त्यांनी तात्काळ होकार दिला. त्या साधू पुरुषाने त्या माणसाला एक छोटासा दिवा दिला आणि म्हणाले, “आज संध्याकाळी अंधार पडल्यावर हा दिवा तुला जिथे अंधार वाटतो आहे तिथे पेटव.”
माणसाला वाटले, की एवढ्याशा दिव्याने काय होणार आहे? मनात संशय निर्माण झाला होता तरी पण अंधाराचे दुःखच इतके मोठे होते की, आपण साधूने जे सांगितले आहेत ते करून पाहावे असे त्याला पुन्हा पुन्हा वाटत होते. त्याने साधूंचे म्हणणे मान्य केले.
संध्याकाळ झाली. सूर्य मावळतीला गेला. घरात पुन्हा नेहमीसारखा अंधार पसरू लागला. नेहमीप्रमाणे तक्रार करण्याऐवजी त्याने दिवा पेटवला.
आश्चर्य म्हणजे दिवा पेटताच खोलीतील अंधार क्षणात नाहीसा झाला. ज्या अंधाराशी तो वर्षानुवर्षे लढत होता, तो एका छोट्याशा दिव्यापुढे टिकू शकला नाही. दुसऱ्या दिवशी तो साधूंकडे गेला आणि म्हणाला, “महाराज, हा तर चमत्कार झाला! इतक्या वर्षांचा अंधार एका क्षणात निघून गेला.”
साधू म्हणाले, “अंधाराला कधीच स्वतंत्र अस्तित्व नसते. तो फक्त प्रकाशाच्या अनुपस्थितीचे नाव आहे. तू अंधाराशी लढत होतास, म्हणून तो जात नव्हता. जर सुरुवातीलाच दिवा लावला असतास तर अंधाराचा प्रश्नच निर्माण झाला नसता.”
माणूस विचारात पडला.
साधू पुढे म्हणाले, “जीवनातही हेच घडते. लोक दुःख, राग, मत्सर, भीती, अज्ञान यांच्याशी लढत राहतात; पण त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला जात नाही तर फक्त अंधाराशी संघर्ष केला जातो. जीवनातील दुःख कमी करण्याचा संघर्ष हा मार्ग नाही. त्यासाठी माणसाने प्रेमाचा दिवा लावायला हवा, जागृतीचा, ज्ञानाचा दिवा लावला, की मग अज्ञान आणि दुःख आपोआप नाहीसे होईल.”
त्या दिवसापासून त्या माणसाचे जीवन बदलले. त्याने तक्रारी सोडल्या आणि स्वतःमध्ये प्रकाश निर्माण करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याच्या जीवनात आनंद, शांतता आणि समाधान येऊ लागले.
अंधाराशी लढून अंधार दूर होत नाही; प्रकाश निर्माण करावा लागतो.
दुःखाशी झगडण्यापेक्षा आनंदाची कारणे शोधावीत.
अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानाचा दिवा पेटवावा.
जीवनातील समस्या अनेकदा प्रकाशाच्या अभावामुळे निर्माण होतात.
“अंधाराला दूर करण्याचा प्रयत्न करू नका; प्रकाश निर्माण करा. अंधार आपोआप निघून जाईल.” जीवनात आपण काय करायला हवे हे एकदा कळायला हवे.
त्यासाठीच जीवनाचा शोध घ्यायला हवा. जीवनातील असलेल्या समस्यांचा शोध घेताना केवळ त्यांचा जप करण्यापेक्षा त्यावर मात करण्यासाठी ज्ञानरूपी प्रकाशाचा दिवा सातत्याने प्रज्वलित करायला हवा. ज्ञानाचा दिवा आयुष्यात पेटला की आयुष्यातील दुःखाचा अंधःकार आपोआप नष्ट होईल. मुळातच आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे याचे कारण फक्त अज्ञान हेच आहे. अज्ञानामुळेच जीवनाचा रस कमी होतो आहे. जीवनातील सर्व समस्या, दुःख जे आहे त्यामागे केवळ अज्ञान हेच कारण आहे. ते एका अविद्येचे फळ आहे. आपल्या आयुष्यातील अविद्या हे दुःखाचे कारण असेल तर त्याच्या निराकरणासाठी आपण ज्ञानाचा दिवा हातामध्ये घेऊन चालत राहायला हवे. आपण जसे चालत राहू तसा दिवा प्रकाश देत राहील. त्या ज्ञानरूपी प्रकाश दिव्यामुळे जीवनातील आणि भविष्यातील येणारा अज्ञानाचा अंधःकार देखील नष्ट होईल यात शंका नाही.
- संदीप वाकचौरे
प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक ८ ते १४ जून २९०२६
.jpg)



Comments