top of page

मनोरंजक आणि माहितीपूर्ण : परदेशातल्या पाऊलखुणा

  • 3 days ago
  • 4 min read

Updated: 2 days ago


अनिल दातीर यांनी लिहिलेल्या आणि ‌‘चपराक प्रकाशन‌’तर्फे प्रकाशित होत असलेल्या ‌‘परदेशातल्या पाऊलखुणा‌’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, दि. 22 मार्च 2026 रोजी समारंभपूर्वक होत आहे. या पुस्तकाला सातारा येथील डॉ. संदीप गजानन श्रोत्री यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. हे पुस्तक आपण ‌‘चपराक‌’च्या संकेतस्थळावरून घरपोच मागवू शकाल.


अनिल दातीर हा माझा मित्र. त्याचे आणि माझे आपापल्या क्षेत्रामधील व्यावसायिक जीवन साधारण एकाच वेळी आणि शेजारी शेजारी सुरु झाले. तो वास्तुविशारद आहे. सातारा शहरातील देवी चौक ह्या तत्कालीन मध्यवर्ती असणाऱ्या भागामध्ये माझा शाळकरी मित्र नितीन कुलकर्णी ह्याच्या कार्यालयात तो नोकरीसाठी रुजू झाला आणि त्याच दरम्यान आम्ही दत्तकाशी रुग्णालय देवी चौकात जुन्या वाड्यात सुरु केले होते. (1991-92). दुर्गम अकोले तालुक्यातल्या गणोरे नावाच्या एका छोट्या खेड्यातून तो सातारा शहरात आला होता. अतिशय कष्टाने, चिकाटीने आणि जिद्दीने त्याचा प्रवास हा थेट त्याच्या बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्षपदापर्यंत कसा झाला, ह्याचा साक्षीदार मी आहे. काळाच्या रेट्यात आणि ओघामध्ये आम्ही देखील जुन्या वाड्यात सुरु केलेल्या रुग्णालयाचे रुपांतर नव्या सुसज्ज इमारतीमध्ये केले ते त्याच्याच नियोजनानुसार कारण आमचे रुग्णालय, माझे घर यांचे आराखडे त्यानेच केले होते.


आमच्या दोघांत आणखी एक साम्य आहे, ते म्हणजे भटकंतीचे आणि त्या भटकंती दरम्यान जे जे आम्ही आमच्या नजरेने टिपले, जे जे आम्ही अनुभवले ते ते कागदावर लिहून जोडीला उत्तम छायाचित्रे काढून सर्वसामान्य लोकांपुढे ठेवण्याचे! स्थानिक वर्तमानपत्रे आणि समाजमाध्यमे यावर प्रसिद्ध करणे! अनिल हा मोठा लोकप्रिय असा लेखक कवा ब्लॉगर आहे, ह्यात शंका नाही.


‌‘परदेशातल्या पाऊलखुणा‌’ हे अनिलचे पहिले पुस्तक आज वाचकांपर्यंत येत आहे, ह्याचा मला विलक्षण आनंद झाला आहे. ह्या पुस्तकात अनिलने केलेल्या एकूण दहा-पंधरा देशांच्या भटकंतीचे वर्णन आले आहे. वाचकांसाठी ही एक मोठी मेजवानी आहे ह्यात वादच नाही. सुरुवातीलाच लेखक लिहितो की त्यांच्या बिल्डर असोसिएशनची दरवर्षी एकतरी परदेशी वारी असतेच. अर्थात ती कुणी स्पॉन्सर करत नसतात, आपापल्या खर्चानेच करायची असते हे मुद्दाम लेखक लिहितो! आवड असेल तर सवड मिळतेच हे खरे आहे. त्या जोडीला असेही म्हणत येईल की आवड असेल तर रोकड देखील उपलब्ध होते!


एकूण आठ प्रकरणामध्ये निम्म्या युरोपची आणि काही आशियाई देशांची सहल वाचकाला घडते. युरोप खंडातील देश का निवडले, ह्याचे कारण लेखक सांगतो, कारण हे देश फार लांबही नाहीत आणि जवळही नाहीत. सहा-सात तास विमान प्रवास आणि आपल्या खिशाला परवडतील असे राहणीमान असते. त्याच वेळी सांस्कृतिकदृष्ट्‌‍या अत्यंत वैभवशाली आहेत. तेथील थंड आणि अतिथंड वातावरणामुळे तेथील इमारतींना देखील फारशी हानी झाली नाही. अनिल स्वतः वास्तू विशारद असल्यामुळे आपल्याकडील इमारती उन-वारा-पाउस ह्यांनीच लवकर खराब होतात, हे आवर्जून लिहितो. त्यांच्या सर्व सहली ह्या ग्लोबल हॉलिडेज या कंपनीने निश्चित केल्यामुळे त्याचे मालक श्री. अल्ताफभाई यांची आणि अनिलची उत्तम दोस्ती झाली आहे, ह्यात नवल नाही परंतु त्यामुळे सहल नियोजन हे जास्त वैविध्यपूर्ण आणि आपुलकीचे होते हे वाचकांनी लक्षात घ्यायला हवे. आपल्या अपेक्षा ह्या आयोजकांना माहिती असतात.


अनिल हा डोळस पर्यटक आहे, जागरूक प्रवासी आहे, सूक्ष्म निरीक्षणशक्ती त्याला लाभली आहे. सहली आयोजन करताना तो देशांची निवडही अगोदर अभ्यास करून मगच करत असतो. त्याचा मित्रपरिवार त्याला उत्तम साथ करतो. हडता फिरताना कॅमेऱ्यावरील क्लिक बटण हे अतिशय कौशल्याने तो दाबत असतो. तेथील गाईड माहिती करून देताना त्याचे कान तीक्ष्ण असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची स्मरणशक्ती, प्रवासादरम्यान बघितलेल्या ठिकाणांची माहिती योग्य शब्दात उतरविण्याची त्याची कला हे सर्व गुण आपल्याला ह्या पुस्तकात दिसून येतात. त्याच वेळी उत्तम बोलके फोटो बघायला मिळतात. त्याचे स्वतःचे फोटो कमी पण त्याने पाहिलेल्या गोष्टींचे फोटो जास्त असतात. त्यामुळे हे प्रवासवर्णन एखाद्या प्रवासी कंपनीची पुस्तिका न वाटता, मनोरंजक आणि माहितीपूर्ण असा खजिना वाचकांना उपलब्ध होतो. त्याच्यामध्ये दडलेल्या एका अतिशय उत्तम अशा साहित्यिकाची झलक बघायला मिळते.


त्याने भेटी दिलेल्या देशांची यादी बघितली तरी आपण अवाक होतो. जर्मनी, लक्झेम्बर्ग, बेल्जियम, पोलंड, उझबेकिस्तान, स्पेन, दुबई, सगापूर, रशिया, इजिप्त, हंगेरी, नेदरलंड, स्लोवाकिया आदी देशांच्या सहलीचे या पुस्तकात वर्णन केले आहे. पोलंडमधील छळ-छावण्या बघताना तो गहिवरून येतो तर हिमाच्छादित आल्पस पर्वतशिखरे बघताना उल्हासीत होतो. ताश्कंदमधील लालबहादूर शास्त्री यांच्या शेवटच्या मुक्कामाच्या हॉटेलसमोर तो नतमस्तक होतो, तर एअर इंडिया विमानातील वाईट अनुभव लिहिताना मुद्दाम टाटा उद्योग समूहाचा आदराने उल्लेख करतो. सदैव त्या त्या देशाची आणि भारताची नकळत तुलना करत असतो. परदेशातील चांगल्या बरोबरच वाईट गोष्टी, चालीरीती आणि संस्कृतींची देखील माहिती आपल्याला ह्या वर्णनात वाचायला मिळते. व्हिसा, विमानप्रवास पासून ते तेथील करन्सी, शॉपग मॉल आणि स्थानिक प्रवास साधने हे देखील ह्या पुस्तकात मुद्दाम सांगितले आहे. दुबई येथील इमारती ह्या अनिलच्या वास्तू-विशारदाच्या नजरेने बघताना आपल्याला अधिक समाधान लाभते. सगापूर विमानतळ हे स्वतःच एक मोठे प्रेक्षणीय स्थळ आहे, हे वाचताना आपल्याला आश्चर्य वाटल्यावाचून राहवत नाही.


परदेशवारीमधील असे अनेक अनुभव आणि भारत आणि तो विदेश ह्यांचे तुलनात्मक वर्णन वाचताना आपण केव्हा लेखकाबरोबर प्रवास करत आहोत असा भास व्हायला लागतो हे कळत नाही. प्रत्येक देशाचे वर्णन करत बसत नाही. वाचकाची उत्सुकता चाळवणे हे प्रस्तावनेचे काम आहे. कुकरच्या पहिल्या शिट्टीमध्ये आत काय शिजते आहे, ह्याचा घमघमाट नाकाला येतो, तशीच ही प्रस्तावना आह. आतमधील आंबेमोहर भाताचा स्वाद प्रत्येक वाचकाने घ्यावा.


ह्या पुस्तकातील एक अनुभव मात्र आपल्याला चटका लावून जातो, अंतर्मुख व्हायला लावतो, तो सांगतो आणि ही प्रस्तावना पूर्ण करतो. अनिल रशियामधील स्वच्छता, सुबत्ता आणि शिस्त बघून लिहितो, ‌‘आमच्या पैकी एक मित्र म्हणाला की, आपल्या आजोबा, पणजोबा ह्यांना का नाही वाटले की अशा देशात जाऊन राहायचे? मग आपलाही जन्म ह्याच देशात झाला असता?


त्यावर लेखक लिहितो, ‌‘आपण आठ-दहा दिवस येथे येतो आणि आपल्याला असे वाटले तर मग आपली मुले शिकण्यासाठी विदेशात जातात, दोन-तीन वर्षात त्याच देशांची होऊन जातात, त्यात त्यांना मातृभूमीचा विसर पडला, म्हणून आपण दोष देणे किती चुकीचे आहे?‌’ याचबरोबर ‌‘मला मात्र भारत सोडून कोणत्याही देशात राहण्याची इछा झाली नाही‌’ हेही तो आवर्जून सांगतो.


गेली चार-साडेचार वर्षे आम्ही सातारा शहर आणि आसपासच्या भागातील उत्तम पुस्तक वाचकांचा ‌‘आम्ही पुस्तकप्रेमी समूह‌’ तयार केला आहे. आजपर्यंत (जानेवारी 2026) गेले दोन हजार दिवस रोज सकाळी एका नवीन पुस्तकाचा परिचय आमच्यापैकी एक जण लिहित असतो. हे व्रत अखंड चालू आहे. अनिल हा आमच्या समूहाचा एक चोखंदळ वाचक आणि उत्तम परिचय करता आहे. तो एक जागरूक नागरिक आहे. मुळात आमच्या समूहाचे ब्रीद हे आहे की


‌‘जे जे आपण वाचिले, ते ते वर्णावे ऐसे,


सहयात्री करोनी सोडावे, सकल वाचक.‌’


ह्या ओळी सार्थ करणारे त्याचे लेखन असते. त्याचा प्रत्यय वाचकाना त्याच्या ह्या पुस्तकात देखील आल्याशिवाय राहणार नाही. मुळात अनिल ह्या नावाचा अर्थच ‌‘वारा‌’ असा. त्यामुळे पायात भगरी घेऊन जन्माला आलेल्या अनिल ला भविष्यातील भटकंतीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्याच्या ह्या ‌‘परदेशातल्या पाउलखुणा‌’ ह्या पुस्तकाबद्दल अभिनंदन. ह्या पाऊल खुणा अशाच दुरदूर उमटत जाव्यात आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आमच्यासारखे वाचक देखील चालत राहोत, ही अपेक्षा.


- डॉ. संदीप गजानन श्रोत्री, सातारा

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page