top of page

शांत पावलांनी सत्तेच्या उंबरठ्यावर

  • Mar 5
  • 2 min read

राजकारणात काही व्यक्ती गडगडाट घेऊन येतात तर काहींचे आगमन शांत असते पण त्याची चाहूल काळाला लागते. सुनेत्रा वहिनींचा उपमुख्यमंत्रीपदाचा प्रवास हा दुसऱ्या प्रकारातला आहे. हा प्रवास घोषणा करत नाही, तो साक्ष देतो.


पवार कुटुंबात बाहेरून आलेली ही स्त्री, कधीच ‌‘मी‌’च्या गजरात नव्हती. तरीही काळाच्या ओघात तीच अधिक स्थिर, अधिक निर्णायक, अधिक पॉवरफुल ठरली. सत्ता ही केवळ पदात नसते, ती विश्वासात असते आणि सुनेत्रा वहिनींनी तो विश्वास आयुष्यभर कमावला आहे.


शरद पवार यांची राजकीय दृष्टी आणि दीर्घ अनुभव, सुप्रिया सुळे यांची आधुनिक संवेदनशीलता आणि संवादक्षमता आणि सुनेत्रा वहिनींची न बोलता काम करणारी समाजकारणी भूमिका या तिघांची अदृश्य सांगड आज एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. हा केवळ व्यक्तिंचा योगायोग नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत वळण आहे.


समाजकारणात सुनेत्रा वहिनी सतत कार्यरत राहिल्या. प्रसिद्धीपासून दूर, कॅमेऱ्यांपासून अलिप्त. महिलांचे प्रश्न, कुटुंबाचे दुःख, ग्रामीण जगण्याची कळ हे त्यांचे विषय होते. भाषणांपेक्षा भेटी, आश्वासनांपेक्षा आधार आणि प्रसिद्धीपेक्षा परिणाम ही त्यांची कार्यशैली राहिली. म्हणूनच त्यांच्या कामाला आवाज नव्हता पण वजन होते. आज जेव्हा महाराष्ट्र उपमुख्यमंत्रीपदावर एक स्त्री पाहणार आहे, तेव्हा तो क्षण केवळ राज्यापुरता मर्यादित राहणार नाही. अख्खा देश पाहील, की सत्ता आरडाओरडीतच असते असे नाही. कधी ती शांतपणे येते आणि खोलवर रुतते.


सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व हे नजरेआड पण निर्णायक असेल, याची जाणीव अनेकांना आतून आहे. आणि एक गोष्ट स्पष्ट सांगायला हवी. दादा गेलेले नाहीत. मित्रांनो, ते कुठेही गेलेले नाहीत.


अजित पवार ही केवळ व्यक्ती नाही, ती एक चालणारी ऊर्जा आहे. आज ती ऊर्जा अधिक संयमी झाली आहे, अधिक परिपक्व झाली आहे. सुनेत्राच्या पाठीशी उभा असलेला दादा हा सावली सारखा आहे. दिसत नाही पण उन्हापासून वाचवतो. आक्रमक राजकारणाच्या प्रवासानंतर आज तोच अनुभव सुनेत्रा वहिनींच्या शांत नेतृत्वाला बळ देतो आहे. थोडी करडी भाषा बोलायची तर हेही सत्य आहे की महाराष्ट्राचे राजकारण अजूनही पुरुषप्रधान आहे. स्त्री नेतृत्वाला संशयाने पाहिले जाते पण सुनेत्रा वहिनींना आरक्षणाची ढाल नाही, कामाचा इतिहास आहे. सहानुभूतीचा आधार नाही, विश्वासाची जमीन आहे. म्हणूनच त्यांचे उपमुख्यमंत्रीपद हे प्रयोग नाही तर परिणाम असेल. या सगळ्यात करुणा आहे कारण हा प्रवास सहज नव्हता. संघर्ष आहे कारण मौन पाळत पुढे जाणे सोपे नसते! आणि आशा आहे कारण अशी शांत सत्ता राज्याला स्थैर्य देऊ शकते. पवार कुटुंबात बाहेरून आलेली ही वहिनी आज कदाचित सर्वात आतून मजबूत उभी आहे. तिच्या शब्दांपेक्षा तिची उपस्थिती अधिक बोलकी आहे आणि म्हणूनच, सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व हे केवळ एक पद नसेल


तो महाराष्ट्राच्या राजकारणातील शांत आत्मविश्वास असेल.


रमा जाधव, कोल्हापूर | 8007997223



Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page