अद्भुत प्रवास!
- Aug 4
- 4 min read
कारणे काहीही असोत, प्रत्येकाला प्रवास हा करावाच लागतो! मी तर प्रवासाबाबतीत नादखुळा. काल माझ्या गावी म्हणजे ईश्वरपूरला थोड्या कामासाठी जाऊन रात्रीपर्यंत परत आलो.
“आम्ही कारशिवाय कुठे जात नाही”, “आम्ही दोनचाकी कधीच वापरत नाही”, असे म्हणणारी माझी मित्रमंडळी आहेत! पण मी एक साधा माणूस. बऱ्याच देशांत पर्यटन करून आलो, पण कुठेही जाताना पब्लिक ट्रान्सपोर्टने जायला मला आवडते. आपल्याशिवाय समाजातील इतर लोक कसे जगतात, वागतात वगैरे बघायला मिळते, खूप काही शिकायला मिळते.

तर मंडळी, सध्याच्या सुंदर अन् तुफान पावसाळी मोसमात घरातून बाहेर पडण्यासारखा आनंद नाही. मेट्रोने सकाळी पावणेआठला स्वारगेटला पोहोचलो. सांगली किंवा मिरज बस त्यावेळी फलाटावर नव्हती. म्हटलो कोल्हापूर बसने पेठ नाक्याला उतरून ईश्वरपूरला जाता येईल. तिकीट काउंटरवर गेलो आणि आजच्या माझ्या अद्भुत प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
मी पेठ नाक्याचे तिकीट मागितले. ओळखपत्र दाखवले. आपोआप वाढलेल्या वयामुळे मिळणाऱ्या ५०% सवलतीचा लाभ का घेऊ नये, नाही का? काउंटरवरील व्यक्ती म्हणाली, “२६५ रुपये द्या.” मी म्हटलो, “ऑनलाइन देतो.” ‘चालेल’ म्हटल्यावर त्यांनी बारकोड दिला. मी रक्कम टाकून पैसे ट्रान्सफर केल्याक्षणी त्यांनी तिकीट (पावती) माझ्या हातात दिली आणि म्हणाले, “तुमचे तिकीट कॅशने जनरेट झाले आहे, तुम्हाला कॅशच द्यावी लागेल.”
म्हटलो, “असे कसे होईल? माझे पैसे तुम्हाला ट्रान्सफर झाले आहेत.” बँकेचा मला आलेला मेसेज त्यांना दाखवला. त्यावर त्वरित उत्तर आले की, “तुम्ही पेठ नाक्याला पोहोचेपर्यंत ते पैसे तुमच्या खात्यात परत जमा होतील.”
म्हटलो, “नाही झाले तर काय?”
तर म्हणाले, “नक्की होणार म्हणजे होणार!”
मी तिकीट काढून हा लेख लिहिपर्यंत २६ तास उलटून गेले, अजूनही माझ्या खात्यावर पैसे रिफंड झालेले नाहीत. मुळात सगळे डिजिटल झाले आहे, नको तिथे बोटे लावल्याशिवाय कॅश बिल निघेलच कसे? हुज्जत घालत बसण्याचा माझा स्वभाव नाही. पाचशे रुपयांची नोट दिली. राहिलेले पैसे त्यांनी मला दिले. त्यात तीस रुपये कमी होते. म्हटलो, “काय झाले?”
“सुट्टे नाहीत आता! पण ड्रायव्हरसोबत पाठवून देतो, तुम्ही गाडीत बसा.” (त्यांनी पाठवले ३० रुपये, सोनावणे म्हणून होते ते बहुतेक.)
तिकिटावर सीट नंबर नव्हता. म्हणाले, ४ आणि ५ सोडून कुठेही बसा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या भल्या मोठ्या ‘शिवनेरी’त येऊन बसलो. आधीपासून आत गेलेले प्रवासी बसलेले होतेच. एका रिकाम्या सीटशेजारी बसलेल्या प्रवाशाला विचारले, “शेजारी कोणी बसले आहे का हो?” ते म्हणाले, “सीट ओली आहे.” आणखी मागे गेलो. पुन्हा एकाला विचारले. “या सीटवर वरून पाणी पडते आहे,” असे उत्तर मिळाले. मी चक्रावलो हो! आणखी मागे गेलो. दोन्ही सीट रिकाम्या होत्या. छान मूडमध्ये बसलो आणि मंडळी, रिलॅक्स होण्यासाठी माझ्याच सीटवर सहज मागे टेकलो. जत्रेमध्ये पाळण्यात बसल्याची आठवण व्हावी, इतक्या जलद गतीने ती सीट माझ्यासकट मागच्या बाजूला पूर्ण खाली झुकली. मागे बसलेला प्रवासी माझ्यावर ओरडला, कारण माझे डोके त्याच्या मांडीवर स्थिरावले होते. “अहो, काय करताय?” म्हटलो, “अहो, मी कुठे काय केले? माझ्या सीटवर मी टेकून बसणे हा गुन्हा आहे का?”
माझ्यासारख्या केस पांढरे झालेल्या माणसाचे डोके त्याने का बरे त्याच्या मांडीवर सांभाळावे? मी तत्परतेने पुन्हा सरळ बसलो. दरम्यान ८ वाजले आणि बस सुरू झाली. थोडा वेळ मी माझ्या पुढच्या सीटला पाठीमागून हाताने घट्ट धरून बसलो, पण ते काही सुसह्य नव्हते. शेवटून तीन नंबरच्या सीटवर एक जागा रिकामी बघून मी तिथे जाऊन बसलो. बाहेर छान पावसाळी मोसम, म्हटलो आता हा माहोल मस्त एन्जॉय करूया! अशा वेळी मी मोबाईल अजिबात उघडत नाही. (काही जणांना हे खरे वाटणार नाही, पण जाऊ द्या ना).
१०-१५ मिनिटांत वरुणराजा प्रसन्न झाला आणि प्रेमाने जोरात बरसायला लागला! आणि काय सांगू मंडळी, मी बसमध्ये आहे की बाहेर पावसात, अशी शंका यावी इतके पाणी बसच्या वरच्या भागातून माझ्या अंगावर यायला लागले. मला पाऊस खूप आवडतो की पावसाला मी जास्त आवडतो, नक्की कोण कोणाच्या प्रेमात आहे हे मला समजेनासे झाले हो. छान वातानुकूलित शिवनेरी बसमध्ये वरून गार हवा येत असताना, बाहेरच्या पावसाची कृपा आत बसलेल्या माझ्यासारख्या पामरावर व्हावी? मी गेल्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य केले असावे. सगळी बस भरलेली होती. जिथे जिथे रिकाम्या सीट होत्या, त्या सगळ्या सीटवर वरून पाऊस कोसळत होता. ड्रायव्हर बिचारा त्याचे काम बिनबोभाटपणे करत होता. त्याला सांगून काय निष्पन्न होणार? आणि त्यात पांढरे केस असलेले लोक खूपच शंका काढून इतर लोकांना उगीच त्रास देत राहतात, असा समज समाजात कोणी निर्माण करून ठेवला आहे कोणास ठाऊक? तर असो....
मला कितीही पाऊस आवडत असला तरी, मी तसेच बसलो तर ईश्वरपूर येईपर्यंत वातानुकूलित बसमध्ये माझी अंघोळ झाली असती. कित्ती वेगळा अनुभव, नाही?
साडेचार ते पाच तास प्रवास कसा सुसह्य व्हावा याचा विचार करत होतो. आणि लक्षात आले की सुपीक डोक्यातून स्रावलेला एक उपाय आपल्याकडे आहे. मी माझी सॅक उघडली आणि त्यातून छत्री बाहेर काढली. केस पांढरे झाले तरी बुद्धी शाबूत असते हो...
वातानुकूलित बसमध्ये मी छत्री उघडून बसलो आणि बाहेरच्यासोबत आतील पावसाचा आनंद घेऊ लागलो. तो माझा आनंद क्षणात मावळला हो! मागील सीटवर बसलेले बाबा मला म्हणाले, “ओ ओ, काय करताय?” म्हटलो, “मी काय केले आता? मला बसमध्ये अंगावर पाऊस नको असेल तर मी छत्री उघडू शकत नाही का?”
तर ते बिचारे म्हणाले, “तुमच्या छत्रीच्या काडीसोबत सगळे पाणी माझ्या अंगावर येते आहे.”
मला जाणीव झाली की पावसावर कितीही प्रेम असले किंवा तो माझ्या प्रेमात असला, तरी इतरांच्या अंगावर छत्रीवरून पडणाऱ्या पागोळ्या जाता कामा नयेत. मग चारी बाजूंनी सैनिक जसे खूप बारीक लक्ष ठेवतात, तसे ठेवून मी छत्रीचा अँगल सगळ्या बाजूंनी बघून माझ्या उजव्या, डाव्या बाजूला, पुढे/मागे बसलेल्या कोणावरही आतील पावसाची कृपा होऊ नये याची खबरदारी घेतली. स्वारगेट ते कराड असा प्रवास वातानुकूलित बसमधून छत्री घेऊन करण्याचा योग नशिबाने माझ्या वाट्याला आला. नंतर एक प्रवासी उतरल्यामुळे मला छत्रीशिवाय पेठ नाक्यापर्यंत फक्त बाहेरील पावसाचा आनंद घेता आला. श्रावणधारा माझ्यावर एवढ्या प्रसन्न होतील, असे स्वप्नातसुद्धा कधी वाटले नव्हते.
पुढे बसलेले प्रवासी जेव्हा अधूनमधून सहज मागे बघायचे, तेव्हा बसमधील छत्रीधारी मला बघून छान हसायचे. माझे केवढे फोटो घेतले सर्वांनी! मला अगदी लाजल्यासारखे झाले हो. माझ्या मागे बसलेल्या माय- लेकींपैकी कोणीतरी माझा हौसेने व्हिडिओ पण काढला. मी बऱ्याच देशांत भ्रमंती केली आहे; पण तुम्हाला सांगतो, आपल्याकडील लोकांची सहनशीलता इतरत्र कुठेही बघायला मिळाली नाही. सध्या बऱ्याच लोकांना घरातही सहनशक्ती वाढवावी लागते. तसेच बाहेरही वाढवावी लागणे ही काळाची गरज असू शकत नाही का?
बघा बरे, आपल्या जनतेची केवढी काळजी घेत असते... सामान्य जनतेला अशा अद्भुत प्रवासाचा न विसरता येण्याजोगा अनुभव परिवहन महामंडळ, त्यातील अधिकारी, परिवहन मंत्री नक्की कोण घेत असतील, या भानगडीत जनतेने कधीच पडू नये. नेहमी सकारात्मक विचार करून येईल त्या प्रसंगातून आपला आपण आनंद घेत राहावा, हेच उत्तम ना? बऱ्याच ‘का?’ची उत्तरे सामान्य माणसाने विचारायची नसतात; कारण ‘भारत माझा देश आहे आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ हे कधीही विसरायचे नसते बरं का!
अशीच कोणाला वेगळी सफर करावयाची असेल, तर जरूर शिवनेरीने प्रवास करायला विसरू नका बरं का!
- डॉ. बी. व्ही. कुलकर्णी
कवी आणि लेखक
+91 94220 10682
.jpg)



Comments