top of page

स्मृतिंच्या आकाशातलं चांदणं

  • Mar 30
  • 2 min read

आज कित्येक दिवसांनी गावी माडीवर झोपण्याचा योग आला. रात्रीचं जेवण आटोपलं आणि नकळत पाय माडीच्या पायऱ्यांकडे वळले. जणू त्या पायऱ्यांनाही माझी चाहूल लागली होती. खूप दिवसांनी भेटलेल्या जुन्या मित्रासारख्या त्या मला शांतपणे वर नेत होत्या. माडीवर पाऊल ठेवताच अंगभर पसरलेलं आकाश माझ्याकडे पाहून हसल्यासारखं वाटलं. आकाशभर विखुरलेल्या चांदण्या मोत्यांसारख्या चमकत होत्या. चंद्रही आज काहीसा जास्तच जवळ वाटत होता. जणू तो हळूच विचारत होता, ‌‘किती दिवसांनी आलास रे!‌’ त्या क्षणी मनात एक विलक्षण शांतता उतरली.


माझा लहान मुलगा माझ्या शेजारी पडला होता. त्याच्यासाठी हे सगळं अगदी नवीन होतं. शहरात वाढलेल्या त्याच्या छोट्याशा डोळ्यांनी इतकं स्वच्छ, इतकं सुंदर आकाश याआधी कधी पाहिलंच नव्हतं. तो आकाशाकडे एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यांत चांदण्यांचं प्रतिबिंब चमकत होतं. अचानक तो कुजबुजला, “बाबा, इतक्या चांदण्या रोज असतात का हो?”


त्या निरागस प्रश्नानं माझ्या मनात दडलेल्या आठवणींचे दरवाजे एकामागून एक उघडू लागले.


लहानपणी आमचं आयुष्य फार साधं होतं पण त्यात एक वेगळी श्रीमंती होती. रात्रीचं जेवण उरकलं की आम्ही सगळी भावंडं गोधड्या घेऊन माडीवर जमायचो. मग सुरू व्हायचा आकाशाशी संवाद. कोणी तारका मोजायचं तर कोणी आकाशात वेगवेगळे आकार शोधायचं. “तो बघ सप्तर्षी!”, “अरे, तो तारा हलतोय बघ!” असं म्हणत आकाशातल्या प्रत्येक चमकत्या ठिपक्याशी आमची मैत्री जुळायची. कधी एखादा तारा तुटताना दिसला की आनंदानं आरडाओरडा व्हायचा. तेवढ्यात बाबा हसत म्हणायचे, “लवकर इच्छा मागा देव ऐकतो बरं!”


कधी आजीच्या गोष्टी रंगायच्या, कधी भुताखेतांच्या गप्पा ऐकून भीतीने चादरीत शिरायचो तर कधी दुसऱ्या दिवशीच्या खेळांचे बेत आखले जायचे. त्या रात्रींना एक वेगळीच गोडी होती. वाऱ्याची मंद झुळूक, झाडांची सळसळ तर कधी रातकिड्यांचा किर्र आवाज! या सगळ्यात एक अनोखं संगीत दडलं होतं. त्या चांदण्यांच्या साक्षीनं आमचं बालपण नकळत फुलत होतं.


आज शहरात रात्र म्हणजे थकव्याचा शेवट. तिथे शांतता नाही, आकाश मोकळं नाही आणि माणसांना थांबायला वेळही नाही. दिवसभराच्या धावपळीत माणूस स्वतःशी बोलायलाही विसरतो. शहर आपल्याला आधुनिक सुविधा देतं पण त्या बदल्यात ते आपल्याकडून काहीतरी अमूल्य हिरावून घेतं. निसर्गाची जवळीक, माणसांमधली ऊब आणि मनाला मिळणारी शांतता.


गावात मात्र अजूनही वेळ थोडा संथ वाहतो. लोक नावानं हाक मारतात, एखाद्या घरात दुःख आलं तर सगळं गाव उभं राहतं आणि सण आला की प्रत्येक अंगण उजळून निघतं. त्या साध्या आयुष्यातही एक खोल समाधान दडलं आहे.


माडीवर पडून हे सगळं मुलाला सांगताना माझा आवाज नकळत भरून आला. माझ्या डोळ्यांतलं पाणी पाहून तो हळूच म्हणाला, “बाबा तुम्हाला गाव खूप आवडतं ना?”


मी फक्त हलकेच हसलो; कारण त्या अनपेक्षित प्रश्नाचं उत्तर शब्दांत देणं कठीण होतं. आयुष्याच्या गरजांनी आपल्याला शहराशी बांधून ठेवलं आहे; पण मनाचं नातं अजूनही या मातीशीच जोडलेलं आहे.


मी त्याच्या केसांवरून अलगद हात फिरवत राहिलो. काही क्षणांतच तो शांत झोपी गेला. चंद्रप्रकाश त्याच्या चेहऱ्यावर अलगद उतरला होता. कदाचित त्याच्या मनातही त्या गोष्टींची छोटीशी चित्रं रंगली असतील. मी मात्र अजूनही जागाच होतो, आकाशाकडे पाहत.


त्या चांदण्यांमध्ये मला माझं बालपण दिसत होतं. माझं हरवलेलं साधं आयुष्य दिसत होतं आणि त्या शांत चांदण्या! रात्री मनात एक विचार अलगद उमटला. आपण आयुष्यभर सुखाच्या शोधात धावत राहतो; मोठ्या शहरांत, मोठ्या स्वप्नांच्या मागे! पण कधीतरी अशा चांदण्या रात्री गावच्या माडीवर पडून आकाशाकडे पाहिलं की उमगतं खरं सुख कुठे दूर नसतं. ते आपल्या बालपणीच्या आठवणींत, मातीच्या सुगंधात आणि त्या अथांग आकाशाखाली निःशब्दपणे आपली वाट पाहत असतं.


- मंगेश दौंडकर

भोसरी, पुणे

9890619354

प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक ३० मार्च २०२६ ते ५ एप्रिल २०२६

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page