top of page

संपादकीय : वाचन प्रेरणेचा सुकाळ - पुस्तक दिन विशेष

  • Apr 8
  • 4 min read

या महिन्यात 23 तारखेला ‌‘जागतिक पुस्तक दिन‌’ साजरा केला जातो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यापासून गेल्या काही दिवसांत भाषाविषयक, पुस्तकविषयक उपक्रम झपाट्याने वाढले आहेत. पुस्तक दिनाचेही विविध ठिकाणी कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले जातात. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि समीक्षेच्या दृष्टिने हा कालखंड कधी नव्हे इतका चांगला आहे.

‌‘वाचनसंस्कृती कमी होतेय‌’, अशी ओरड गेल्या अनेक दशकांपासून सुरूच आहे. त्यात मुळीच तथ्य नाही, हे या क्षेत्रातील कुणीही जाणकार सांगेल. उलट वाचणाऱ्यांचे प्रमाण लक्षवेधी वाढत असून त्यात तरूणाईची संख्या मोठी आहे. या मुलांची अभिरूची बदलली आहे, साधने बदलली आहेत पण वाचन मुळीच कमी झाले नाही. शारीरिक स्थूलपणा आणि मनावरील मरगळ सोबत वागवणारी काही मंडळी वाचन कमी झाल्याचे स्वानुभवावरून सांगतात. त्यातली वस्तुस्थिती ही आहे की ही मंडळी कधीही वाचत नव्हती. आपल्याकडे कोणत्या वर्षी किती वाचक होते, याची अधिकृत आकडेवारी कोणीही देऊ शकणार नाही! मग आधी खूप वाचक होते आणि आता ते लयाला गेले आहेत हे कशाच्या आधारे ठरवणार? उलट रोज डझनावरी प्रकाशित होणारी पुस्तके आणि त्याच्या धडाधड निघणाऱ्या आवृत्त्या कशाचे द्योतक आहेत? अनेक तरूणांच्या ब्लॉगला लाखो वाचक असणे आणि त्यातून त्यांनी मजबूत पैसे कमविणे हे अनेक ठिकाणचे वास्तव कसे नाकारता येईल...?


जे साहित्य कालबाह्य होते ते आजची पिढी वाचणार नाही. त्यांची आवड वेगळी आहे. रामायण-महाभारतापासून ते बायबल-कुराणपर्यंत कशाशीही देणे-घेणे नसलेल्या एका मोठ्या वर्गाला आजच्या विषयावरील साहित्य आकर्षित करून घेते. मग आज कालसुसंगत लेखन करणारे किती लेखक मराठीत आहेत? आजच्या पिढीच्या काय समस्या आहेत, त्यांना कोणत्या दिव्यातून जावे लागतेय हे तरी त्यांना उमजते का? वातानुकूलित दालनात बसून पुस्तकांचे नियोजन करणारे प्रकाशक, आलिशान बिछान्यावर लोळत शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना मांडणारे आणि कल्पनाविश्वात रमण्यात धन्यता मानणारे लेखक, ठोकळेबाज विचारसरणीचे डुढ्ढाचार्य समीक्षक, भरमसाठ पगारी असल्याने सामाजिक प्रतिष्ठेसाठी, नोकरीतील बढतीसाठी सुमार पुस्तके छापून घेणारे महाभाग, अशा पुस्तकांना पुरस्कार मिळावेत म्हणून चाललेली त्यांची धडपड, साहित्यिक उपक्रम-ग्रंथालये याबाबत उदासीन असणारे सरकार असे अनेक घटक वाचनप्रक्रियेचे मारेकरी आहेत. तरीही त्यांच्या नाकावर टिच्चून उत्तमोत्तम लिहिणारे, ते प्रकाशित करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविणारे, अतिशय निष्ठेने त्याच्या विक्रीची जबाबदारी पार पाडणारे असे अनेक तारे असल्याने वाचक वाढतच चालले आहेत.


पूर्वी वृत्तपत्रांच्या पुरवण्या वाचकांची अभिरूची घडवायच्या, त्यांना सुयोग्य दिशा दाखवायच्या. सध्या वृत्तपत्र उघडले की त्यात केवळ खून, मारामारी, दरोडे, अपघात, बलात्कार, राजकीय आरोप-प्रत्यारोप हेच वाचायला मिळते. सकारात्मक बातम्या आणि सर्जनशील साहित्य हे माध्यमांचे शेवटचे प्राधान्य ठरत आहे. रविवार पुरवण्यातून पुस्तकांचे संक्षिप्त परिचय प्रकाशित होतात पण मराठीतील सैद्धांतिक, आस्वादक समीक्षाही संपली आहे. नव्याने लिहिणाऱ्या उमलत्या अंकुरांना बळ द्यावे, त्याला प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करावे हा गुणही लुप्त होत चाललाय. मराठीला लागलेले हे प्रतिसादशून्यतेचे ग्रहण सुटणे अत्यावश्यक आहे. ‌‘एक वेळ माझं बाजूला ठेवा पण हा नवा लेखक चांगलं लिहितोय, त्याचं साहित्य बघा‌’ असं मोठ्या मनाने सांगणारे ज्येष्ठ लेखक आपल्याकडे तयार होत नाहीत, तोपर्यंत त्यांना साहित्य व्यवहारावर बोलण्याचा अधिकार नाही.


घर बांधताना आधी त्याचा आराखडा तयार केला जातो. त्यासाठी अनेक वास्तुविशारद झटत असतात. बैठक व्यवस्था कुठे असावी, स्वयंपाकघर कसे असावे, देवघर कुठे करावे, खिडक्या कशा असाव्यात, फ्रिज, वॉशिंगमशीन कुठे ठेवता येईल, बाल्कनीबरोबर ड्राय बाल्कनी कुठे असेल, इतकेच काय तर टॉयलेट कसे आणि कुठे असावे याबाबतचा गंभीरपणे विचार होतो. त्यावेळी ‌‘घरात पुस्तकाचे कपाट कुठे असावे?‌’, हे मात्र त्यांच्या गावीही नसते. घर बांधताना घरात पुस्तकांचे कपाट कुठे असावे? याचा जेव्हा विचार सुरू होईल तेव्हा प्रगतीच्या दृष्टिने आपण एक पाऊल टाकलेले असेल.


सरहद संस्थेने आयोजित केलेल्या पंजाबमधील घुमान इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर तेव्हाचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना ‌‘पुस्तकाचे गाव‌’ ही कल्पना सुचली. महाबळेश्वरजवळील भिलार या गावी ही संकल्पना प्रत्यक्षातही आली. सातारा तालुक्यातीलच प्रल्हाद पार्टे यांच्या पुढाकारातून ‌‘जकातवाडी‌’ हे कवितांचे गाव म्हणून ओळखले जातेय. शिरपूरला पुस्तकांचे उद्यान तयार करण्यात आले. नाशिकला भीमाबाई जोंधळे या आजी ‌‘पुस्तकांचं हॉटेल‌’ चालवतात. असे अनेक उपक्रम पुस्तकांवर प्रेम करणाऱ्यांच्या दृष्टिने ऊर्जेची बेटे आहेत. यांचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे.


अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथदालनेही या चळवळीला बळ देतात. राजेश पांडे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला पुणे पुस्तक महोत्सव अल्पावधीत जागतिक स्तरावर गेला. विविध संस्थांच्या माध्यमातून विभागीय ग्रंथ प्रदर्शने भरतात. ‌‘सकाळ‌’सारख्या महत्त्वाच्या वृत्तपत्रानेही पुस्तक महोत्सव सुरू केला आहे. येत्या मे महिन्यात राजेंद्र टकले आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून बारामतीत पुस्तकांची जत्रा होतेय. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोक गाडेकर यांच्यासारख्या धडाकेबाज, दूरदृष्टी असलेल्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली राज्याचे ग्रंथालय महासंचालनालयही सातत्याने अनेक उपक्रम राबवत असते. हे सगळे पुस्तकांच्या दृष्टिने पोषक म्हणावे लागेल.


पुस्तक दिनाच्या निमित्ताने पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. ‌‘लेखन हे स्वान्तसुखाय असावं,‌’ असं आचार्य मम्मट म्हणायचे! मात्र स्वतःची अभिव्यक्ती प्रकट करणे, विविध विषयांची अभ्यासपूर्वक, तपशीलवार माहिती देणे, आपल्या कल्पनाविष्काराचे दर्शन घडविणे, इतिहासाची माहिती, वर्तमानाचे ज्ञान आणि भविष्याची सुसंगत मांडणी करणे, माणसाचा दृष्टिकोन व्यापक करणे या हेतूने झालेले लेखन चिरकाल टिकते. आपले आकलन, कल्पनाशक्ती वाढवण्याबरोबरच आपल्या विचारांचे क्षितिज उंचावण्याची ताकद वाचनामध्ये आहे. उत्तम स्वास्थ्यासाठी रोज पौष्टिक जेवण करणे, नियमित व्यायाम करणे हे जसे आवश्यक आहे तसेच मेंदूला खाद्य पुरवण्यासाठी रोज काही तरी चांगले वाचणे, मन मोकळे करण्यासाठी लेखनाच्या माध्यमातून व्यक्त होणे आवश्यक आहे. निरोगी, निकोप, निर्मळ व्यक्तिमत्त्वासाठी वाचणे आणि लिहिणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.  


माहिती, मनोरंजन आणि ज्ञान यासाठी पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपली आकलनशक्ती समृद्ध करण्यासाठी, शहाणपण वाढविण्यासाठी पुस्तकांना पर्याय नाही. एखादे पुस्तक सोडा, एखाद्या महत्त्वाच्या पुस्तकातील एखादे अर्थपूर्ण वाक्य वाचूनही आयुष्याला दिशा मिळाली, अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत. समाजमाध्यमामुळे वाचन कमी होतेय, असे म्हटले जात असताना ब्लॉग, व्हाटसॲप, फेसबूक, विविध संकेतस्थळे या माध्यमातूनही अनेक जण उत्तमोत्तम वाचत असतात. सगळेच काही नकारात्मक आहे, असे मुळीच नाही. गेल्या काही वर्षात तर ई-बुकचे प्रमाणही अफाट वाढले आहे. या सुविधेमुळे एकेकाच्या संग्रहात शेकडो पुस्तके सहजी असतात.


अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचे वैभव अनेकांना भुरळ घालेल. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या दहा भाषांत मराठीचा समावेश होतो. ‌‘मराठी शिकल्याने पोट भरते का?‌’ हा प्रश्न केव्हाच निकाली निघाला आहे. ज्याचा भाषेचा चांगला अभ्यास आहे त्याच्यासाठी रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे रोज काहीतरी चांगले वाचणे आणि थोडेफार लिहिण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. यंदाच्या पुस्तक दिनाच्या निमित्ताने तरी त्याची सुरूवात व्हावी, ही अपेक्षा.


घनश्याम पाटील

७०५७२९२०९२

धडक बेधडक | DHADAK BEDHADAK
₹300.00₹225.00
Buy Now



Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page