top of page

अरविंदांच्या विचारांची दिशा आवश्यक : वाकचौरे

  • Mar 6
  • 2 min read

नाशिक, (प्रतिनिधी) ः योगी अरविंद यांच्या विचारांची दिशा घेऊन शिक्षण क्षेत्रात काम झाले असते तर समाज व राष्ट्राचे चित्र बदलले असते. आध्यात्माचा अर्थ केवळ बाह्यांगाने सुधारणा नाही तर ती आंतरिक सुधारणेची ती वाट आहे. योगी अरविंद यांनी शिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना पुस्तकी न शिकवता विचार करण्यास शिकवा, त्याच्या अभिरूचीने प्रवास करू द्या, असे सांगितले आहे असे मत राज्य अभ्यासक्रम व पुनर्रचना समितीचे सदस्य संदीप वाकचौरे यांनी व्यक्त केले.


नाशिक येथील बेंजॉन देसाई फाउंडेशनच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या अनुभूती प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या वितरण संभारभात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संदीप विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संदीप सिन्हा होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सारंग इंगळे होते. व्यासपीठावर संयोजक मनोज टीबरेवाल, अश्विनकुमार भारद्वाज उपस्थित होते. वाकचौरे म्हणाले, जीवनात शिक्षक व्हायचे असेल तर केवळ पदव्या हाती असून फारसा उपयोग नाही. त्याकरिता जीवनानुभूतीची नितांत गरज आहे. अनुभूती म्हणजे उद्याचे विश्व समृद्ध करण्याची वाट आहे. आज विद्यार्थ्यांवर आपण शिकणे लादत आहोत. हे लादणे म्हणजे माणूस होण्याच्या प्रक्रियेपासून दूर घेऊन जाणे आहे. त्या काळात त्यांनी मातृभाषेतील शिक्षणाचा विचार प्रतिपादन केला होता. आजच्या बिघडलेल्या परिस्थितीत आपल्याला खरोखर शिक्षणाचा उत्तम मार्ग सापडला तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात निश्चित बदल झालेला आपणास अनुभवता येईल.


शिक्षण हे केवळ माहितीसाठी नसते तर त्यातून स्वतःच्या उन्नतीचा मार्ग अनुभवायचा असतो. आज शिक्षणाने माणसं शहाणी व्हायला हवीत पण ती अधिक हुशार झाली आहेत. त्या हुशारीने तत्त्वज्ञान, विचारधारेची मोडतोड केली जाते. त्यामुळे आपण सत्त्वहीनतेचा प्रवास करत आहोत. शिक्षणातून आपल्याला माणूस घडवण्यात अपयश आले आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थी स्वतःच शिकत असतो. त्याला शिक्षक मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे शिक्षकांनी क्षमता, अभिरूची, कल याचा विचार करून मार्गक्रमण करण्याची गरज आहे. शिक्षकांना स्वतः शिकावे वाटते आहे ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माणसं उद्याच्या समृद्ध समाजाच्या विकासासाठी अधिक महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वासही वाकचौरे यांनी व्यक्त केला. यावेळी सिन्हा आपल्या भाषणात म्हणाले, आपल्या अनुभवाची मांडणी शिक्षणात अपेक्षित आहे. अनुभवसंपन्नता हेच खरे शिक्षण आहे. शिक्षण जितके अनुभवाशी जोडले जाईल तितके ते अर्थपूर्ण होण्यास मदत होईल. त्यामुळे जीवनात आपली प्रेरणास्थाने निश्चित करून ध्येयाच्या मार्गाने प्रवास केला की, ते निश्चित साध्य करता येते. ही साध्यता आपल्याला शिक्षक होण्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. शिक्षक होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज असेल पण त्यापेक्षा अनुभवसंपन्न शिक्षणाचा विचार अधिक महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवे. प्रास्ताविक आणि अभ्यासक्रमामागील भूमिका मनोज टीबरेवाला यांनी स्पष्ट केली. यावेळी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवाची मांडणी करणारी मनोगते व्यक्त केली. भारद्वाज यांनी आढावा घेतला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.


वृत्तांत : साप्ताहिक चपराक २ ते ८ मार्च २०२६

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page