top of page

जपावं असं फुलणं...

  • Jul 9
  • 2 min read

Updated: Jul 10

सह्याद्री म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती उत्तुंग कड्यांची पर्वतरांग. हिरवाईने नटलेली अन्‌‍ ऋतुंनी सजलेली. काळाच्या ओघातही आपल्या सौंदर्याची मोहिनी टिकवून असलेली अजब शृंखला. महाराष्ट्राच्या हृदयात वसलेली ही निसर्गसंपन्न रांग म्हणजे जैवविविधतेचा एक खजिनाच. इथल्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक दरी-खोऱ्यात निसर्गाने अगणित रत्नं दडवून ठेवली आहेत. याच सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेली परंतु अजूनही फारशी न उलगडलेली एक नाजूक, अल्पायुषी परंतु विलक्षण सुंदर कविता म्हणजे - रानफुलं.


वर्षाऋतुची चाहूल लागली की सृष्टीला जणू नवसंजीवनीच मिळते. पावसाच्या प्रत्येक थेंबाने तिच्या कुशीत नवं जीवन फुलतं. स्वप्नांची उधळण होते. डोंगरातल्या एखाद्या शांत वाटेवरून जाताना, तो रानफुलांचा नाजूक स्पर्श मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजतो. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय वाढणाऱ्या या रानफुलांची कलाकुसर म्हणजे निसर्गाने स्वतः रेखाटलेली एक सुंदर, रंगीबेरंगी आणि सुगंधी कलाच म्हणावी लागेल. रानफुलांच्या मांडणीमध्ये त्यांचे रंग, गंध, पानांची रचना आणि उमलण्याची वेळ हे सगळं इतकं समरस आहे की निसर्ग हा एक अतुलनीय कलाकार आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल.


पावसाळा संपत आला की निसर्ग रंगपंचमी खेळू लागतो. आकाश मोकळं होतं, ढग परतीची वाट धरतात आणि डोंगरवाटा नानाविध रंगानी न्हाऊ लागतात. सोनकीची पिवळी तेजस्वी किरणं चौफेर पसरू लागतात. तुरट्याची निळसर झाक सृष्टीच्या सागराला गूढतेची किनार देते. सीतेची पारदर्शक आसवं, अभोळीचं देखणं रुपडं आणि टाचणी फुलाचं बारकाईनं विणलेलं सौंदर्य हे सगळं अनुभवताना असं वाटू लागतं की ही केवळ फुलं नाहीत. त्या पलीकडचं काही तरी आहेत. त्या अनोख्या सौंदर्यात निसर्गाच्या गूढ भाषेतील शब्द आणि अनुभवांच्या कविता दडलेल्या आहेत. आपल्या मनाशी हितगुज करता करता ही फुलं अंतर्मनातल्या कोपऱ्यात कधी शिरकाव करतात कळतही नाही.


रानफुलं ना कुणी पेरलेली, ना कुणी वाढवलेली. तरीही त्यांचं अस्तित्त्व इतकं सुंदर, सहज आणि बोलकं असतं की त्यांच्या गंधात आणि रंगात हरवून जावं. ना शृंगार ना प्रसिद्धीची हाव. त्यांचं साधेपण हेच त्यांचं सौंदर्य. एकीकडे ती सौम्य, गोड आणि नाजूक असतात तर दुसरीकडे ती प्रतिकूल परिस्थितीला तोंड देणारी, खंबीर आणि आत्मनिर्भर असतात. ऊन, वारा आणि पावसाच्या सरी झेलत, मिळेल त्या जागी ती आपलं अस्तित्त्व टिकवत असतात. मनात जिद्द असली की कठीण परिस्थितीतही फुलता येतं, हेच जणू ती सांगत असावीत.


आज मानवी हव्यासाने, शहरीकरणाच्या विस्ताराने आणि वाढत्या पर्यटनामुळे रानफुलांचं नयनरम्य विश्व विखुरलं जात आहे. त्यांच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. त्यांचं निःशब्द विझणं हे केवळ एक नैसर्गिक संकट नाही तर आपल्या पर्यावरणाच्या, संस्कृतीच्या आणि आगामी पिढ्यांच्या स्वप्नांच्या विघटनाचं चिन्ह आहे. सह्याद्रीची ही अमृतवेल अशीच फुलत राहावी असं वाटत असेल तर आपण सर्वांनी मिळून आताच कठोर पाऊल उचलणं गरजेचं आहे. थोडं संवेदनशील व्हा, जागरूक व्हा आणि रानफुलांच्या अस्तित्त्वासाठी आपली साथ द्या.


- मंगेश मुरलीधर दौंडकर

साप्ताहिक चपराक ६ ते १२ जुलै २०२६

साद निसर्गाची | Saad Nisargachi
₹250.00₹187.50
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page