top of page

कोकणची माणकं

  • Apr 5
  • 3 min read


कोकण हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. कोकणात काय नाही ते सांगा! इथे कशाची म्हणून कमी नाही. निसर्गाने मुक्त हाताने धरणीला दिलेले ते एक वरदानच आहे. माझ्यासाठी कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच आहे.  कोकणचे निसर्गसौंदर्य जितके ‌‘अविस्मरणीय‌’ आहे तितकीच कोकणची माणसेही!


‌‘देवाची करणी आणि नारळात पाणी,‌’ अगदी तशीच ही माणसे! वरून अगदी फणसासाठी निब्बर दिसतात पण आतून गोड गऱ्यासारखी असतात.  कोकणची माणसे कष्टाळू, स्वप्नाळू आणि मायाळू, तशीच ती तितकीच कणखर व संयमीही असतात. कोकणच्या माणसांची बुद्धिमत्ता आणि त्यांच्या जीवनातील संघर्ष त्यांच्या अबोलपणामुळे सहसा पटकन समजत नाही किंवा त्यांच्या सोशिक स्वभावामुळे ते त्याची फारशी वाच्यता कुठे करत नाहीत. अशी ही पापभीरू व प्रांजळ माणसे वाचायला आणि कळायला तेवढीच मातब्बर व्यक्ती हवी आणि त्यात त्या व्यक्तिने कोकणातच जन्म घेतलेला असायला हवा हे मात्र नक्की.


अगदी असेच एक अतिशय प्रगल्भ आणि वैचारिक व सांस्कृतिक बैठक असलेले कोकणातल्या संगमेश्वर येथील ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार तसेच कोकणची शान असणारे व्यक्तिमत्व म्हणजे जे. डी. पराडकर हे होय. त्यांनी लिहिलेले आणि ‌‘चपराक प्रकाशन‌’च्या घनश्याम पाटील यांनी प्रकाशित केलेले ‌‘कोकणची माणकं‌’ हे पुस्तक नुकतेच माझ्या वाचण्यात आले.


कोकण ह्या विषयावर जे. डी. सरांची तब्बल 12 पुस्तके ‌‘चपराक‌’ने प्रकाशित केली आहेत हे खास विशेष आहे. त्यामुळे जे. डी. पराडकरांना ‌‘कोकणरत्न‌’च संबोधने मला जास्त संयुक्तिक वाटते. जे. डी. सरांची कोकण हा विषय मांडण्याची एक विशेष शैली त्यांच्या वैयक्तिक अनुभवाच्या मंथनातून निघालेला ‌‘कोकम अर्क‌’ आहे असे मला आवर्जून म्हणावेसे वाटते.


जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती अशी एक म्हण आहे. अगदी त्याच धर्तीवर ‌‘कोकणची माणकं‌’ हे जे. डी. पराडकर यांचे व्यक्तिचित्रण म्हणजे कोकणातल्या अगदी लहान मुलापासून ते जख्खड म्हाताऱ्या माणसाचे अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून, खूप कष्ट घेऊन, अभ्यासपूर्ण रीतीने व अत्यंत संवेदनशील पद्धतीने त्या त्या व्यक्तिमत्त्वाप्रती व्यक्त केलेल्या भावना आहेत. प्रत्येक व्यक्तिमत्त्व चित्रित करत असताना जे. डी. सरांनी त्या निमित्ताने कोकणची सांस्कृतिक समृद्धी, सण सनावळ, कौटुंबिक जिव्हाळा, नातीगोती, शेजारधर्म, सुसंगत सामाजिक व्यवस्था, आदरातिथ्य, एकोपा आणि परिस्थितीवर मात करण्याची जिद्द अगदी सहजपणे शब्दांकित करून कोकणाप्रती वाचकांची आस्था निर्माण केली आहे.


कोकणातील माणसांचे स्वभाव, त्यांचे गुण आणि दुर्गुण, त्यांच्या सवयी, त्यांच्या लकबी, त्यांच्या आयुष्याचा संघर्ष, खोडकरपणा, माणुसकी, वयोमानानुसार बदलत जाणारे स्वभाव, कोकणातले बालपण, आजी आजोबांचा गोष्टी, त्यांची खाद्य संस्कृती तसेच विविध कलागुणांनी ओथंबून भरलेले अतिशय वाचनीय असे व्यक्तिचित्रण वाचल्याचे समाधान ह्या पुस्तकाने मिळते. कोकणची संस्कृती, परंपरा, रूढी, चालीरीती, कोकणच्या निसर्गाचा अभ्यास, पाना-फुलांचे, फळांचे तसेच जैववैविध्य आणि त्याचा माणसाच्या आयुष्यात असलेला उपयोग, कोकणचा समृद्ध असलेला समुद्र आणि त्याच्या खाऱ्या पाण्यातच असलेला गोडवा यांचे अविस्मरणीय असे चित्रण ह्या पुस्तकाचे अजून एक वैशिष्ट्य आहे.


‌‘कोकणची माणकं‌’ हे पुस्तक वाचताना मी पाहिलेल्या कोकणातील व्यक्तिंची मला अगदी नव्याने ओळख पटली. म्हणजे कोकणात गेली तीस एक वर्षे फिरूनही, कोकणचे हे असे व्यक्तिवैभव पाहण्याचे राहूनच गेले असे म्हणावे लागेल, इतके सूक्ष्म आणि खोलवर निरीक्षण जे. डी. सरांनी या पुस्तकाच्या रूपाने वाचकांना देऊन समृद्ध केले आहे असेच म्हणावे लागेल.


कोकणाबद्दलचा एक सकारात्मक दृष्टिकोन देणारे हे पुस्तक वाचताना आपण त्या व्यक्तिंमध्ये थोडा वेळ का होईना गुंतून जातो हे या पुस्तकाचे फलित आहे. मी मुद्दामहून इथे कुठलेही उदाहरण देत नाही कारण जी काही 16-17 व्यक्तिमत्त्व या पुस्तकात आली आहेत ती सगळीच वाचण्यासारखी आहेत. त्यात त्यांच्या आजूबाजूचा गोतावळा ज्या काही खुबीने जे. डी. सरांनी शब्दबद्ध केला आहे त्याला तोड नाही. प्रत्येक व्यक्तिमत्त्वातील काही चांगल्या आणि समाजपयोगी बाबी हेरून जे.डी.सरांनी त्यांचे अनुभवकथनच या पुस्तकाद्वारे केले आहे असे मला अगदी प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे हे पुस्तक वाचायलाच हवे अशा श्रेणीत आपसूकच जाऊन बसते.


जे.डी.पराडकर वाचकाला कोकणच्या माणकांच्या/माणसांच्या प्रेमात पडायला लावतात हे मात्र नक्की. त्यामुळे ज्यांना कोकणाबद्दल प्रेम आहे आणि आकर्षण आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचायलाच हवे. ज्यांना कोकणाबद्दल जाणून घ्यायचे असेल त्यांनी तर हे पुस्तक वाचाच वाचा परंतु जे. डी. पराडकरांची इतरही पुस्तके नक्की वाचा. मी तुम्हाला खातरी देतो की तुम्ही नक्कीच कोकणच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.


हे पुस्तक www.chaprak.com संकेतस्थळावरुन अथवा 7057292092 या भ्रमणध्वनीवर संपर्क करून मागवू शकता.


- रवींद्र कामठे

9421218528

प्रसिद्धी - 'साप्ताहिक चपराक' ६ ते १२ एप्रिल २०२६


कोकणची माणकं | Kokanchi Manaka
₹250.00₹187.50
Buy Now



Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page