हास्यरंग, ज्यात मी जाहलो दंग
- Mar 30
- 3 min read
जगण्याचा दृष्टिकोन थोडासा विनोदी असेल ना तर आपल्या आसपास, आजूबाजूला इतकेच काय तर आपल्या घरातही घडणाऱ्या प्रसंगातून एक निखळ आनंद देणारा विनोद तयार होत असतो. फक्त आपल्याला तो थोडासा प्रयत्न करून शोधावा लागतो. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आजकाल आनंद म्हणा किंवा थोडासा विरंगुळा मिळाला ना की एक प्रकारची वेगळीच ऊर्जा आपल्यात निर्माण होते. मनावर आणि अर्थातच शरीरावर आलेला ताण एकदम नाहीसा होतो.
गेले काही दिवस तर आपल्या जगावर आणि अर्थातच आपल्या देशावर युद्धाचे ढग पसरलेले दिसत आहेत. 24 तास बातम्या सुद्धा तो सूर आळवत असतात. त्यातून जरा वेगळेपण शोधावेसे वाटले तर ‘हास्यजत्रा’ नावाची मालिका पाहून त्यातल्या त्यात थोडे बरे वाटते. राजकीय विश्लेषण तर पाहून वीट आलेला आहे. त्यात एखाद्या दुख:द घटनेला मीठ-मसाला लावून चर्चेची गुऱ्हाळे अखंडपणे चालू ठेवून टीआरपी वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न सर्व वृत्तवाहिन्या करताना पाहून स्वत:चीच कीव यायला लागते.
एकीकडे नकळत आपल्याला समाजमाध्यमांचा अगदी वीट आला आहे, त्याचे व्यसन जडले आहे असे म्हणत आपण फक्त अंघोळीच्या वेळेस मोबाईल बाथरूममध्ये नेत नाही हाच काय तो फरक आहे. (याला अपवाद असू शकतात). त्यातून हाती काय लागले तर उत्तर नाकारात्मकच येते. आपण या सगळ्याच्या इतके आहारी गेलो आहोत की, आपल्याला वाचनाची गोडी राहिलीच नाही का? असा विचार मनात येतो. मग त्यावर एकच उत्तर आपलेच मन आपल्याला द्यायला लागते, ते म्हणजे ‘आजकाल चांगल्या दर्जाचे लेखन कुठे केले जाते?’ तसे लेखकच नाही राहिलेत वगैरे वगैरे! हे म्हणजे ‘नाचता येईना, अगणं वाकडे!’
या सगळ्यात मी नुकताच ‘चपराक प्रकाशन’च्या कार्यालयात गेलो होतो आणि येताना नुकत्याच प्रकाशित झालेल्या 26 पुस्तकांचा खजिना घेऊन घरी आलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल ‘चपराक’ची सर्व पुस्तके मी नेहमीच अतिशय आवडीने आणि आवर्जून वाचतो; त्याचे कारण त्यामधील वैविध्यता आणि प्रगल्भता हे होय. आपण फक्त वाचत राहायचे. मी ह्या पुस्तकांमध्ये मनसोक्तपणे रमतो, भरपूर वाचतो आणि त्यामुळे मला नवीन विषय कळतात. नवीन तसेच प्रचलित लेखकांशी ओळख होते व लिहिण्यास बळ मिळते.
सांगायचं मुद्दा असा की, यात सुनील भातंब्रेकर यांचा ‘हास्यरंग’ हा अतिशय विनोदी आणि खेळकर शैलीतील लेखसंग्रह हातात पडला. आपल्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या इटुकल्या पीटुकल्या प्रसंगाची अतिशय खोडकर पद्धतीने, बेमालूमपणे केलेली मांडणी माझ्या मनाला फारच भावली. माझ्या मनावरचा ताण एकदम नाहीसा होण्यास मदतच झाली. विनोदी लेखनाचा हा प्रकार जरा वेगळाच वाटला. लेखकाच्या या थोड्या वेगळ्या शैलीचे खूप कौतुक वाटले. या विनोदाला वैचारिक आणि सामाजिक बैठक मला अगदी प्रकर्षाने जाणवली. म्हणजे आपल्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात आणि ऐकण्यात सुद्धा या पुस्तकातील विनोद आणि खोडकर वृत्ती कित्येक वेळा आपल्याला जाणवत असते किंवा तसा विचार आपल्या मनात कधीतरी डोकावून गेलेला असतो परंतु आपण तो शब्दबद्ध करू शकत नाही. नेमकी हीच ती अनोखी शैली सुनील भातंब्रेकर यांनी त्यांच्या लेखणीतून वाचकांपर्यंत लीलया पोहोचवली आहे.
एकूण 10 लेख असलेला हा संग्रह वाचताना मी तर काही काळ चक्क हरवून गेलो होतो. उदाहरणार्थ; ‘ट्रॅफिक जॅम्मत’ हा लेख. आपल्या रोजच्या आयुष्यात सामोरी जाण्याची समस्या लेखकाने ज्या खुबीने मांडली आहे ना की आता जर मी ट्रॅफिकमध्ये अडकलो तर मला भातंब्रेकरांचा लेखच डोळ्यासमोर येणार हे नक्की. ‘अडलंय माझं’ या लेखातही चप्पलसारख्या क्षुल्लक गोष्टीवर केलेला उच्च कोटीचा विनोद फारच भावला. ‘फोटोबाचे अभंग’ तर लेखकामधील कवीला दाद दिल्याशिवाय राहत नाहीत. ‘(वि)मानाचा प्रवास’ तर अचाट आहे. ‘व्यायाम महिमा’ तर घरो घरी अगदी असाच पाहायला मिळतो पण असे लिहिण्याचे धाडस बहुधा कोणी केलेच नसेल.
सुनील भातंब्रेकर यांची निरीक्षण करून त्यावर त्यांनी केलेली विनोदी टिप्पणी अतिशय खिलाडू वृत्तीने इतक्या अफलातूनपणे मांडली आहे की हा लेखसंग्रह जेव्हा जेव्हा मनावर ताण असेल ना तेव्हा तेव्हा वाचायला हवा. मनावरचा ताण तर नाहीसा होईलच पण आपल्यातील एक लहान, खोडकर वृत्तीचे मूल बाहेर पडून तुम्हाला प्रसन्न करेल याची मला खातरी आहे. हेच ह्या पुस्तकाचे यश आहे.
अतिशय सुंदर मुखपृष्ठ साकरल्याबद्दल ज्योती घनश्यामचे आणि अंतर्गत मांडणीसाठी संतोष खुटवड यांचे अभिनंदन. लेखक सुनील भातंब्रेकर यांचे मनापासून कौतुक.
- रवींद्र कामठे, पुणे
94212 18528
प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक ३० मार्च ते ५ एप्रिल २०२६
.jpg)



Comments