top of page

शीतल किरणांची बरसात - चंद्रचाहूल

  • Mar 30
  • 2 min read

सातारा येथील 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखिका मनीषा कुलकर्णी आष्टीकर यांचा नुकताच प्रकाशित झालेला ललित संग्रह म्हणजे चंद्रचाहूल. हा संग्रह ‌‘चपराक प्रकाशन‌’कडून प्रकाशित झाला आहे. पुस्तकाला साजेसे मुखपृष्ठ ज्योती घनश्याम यांनी चितारलेले असून त्यातून स्त्रीच्या मनःपटलावरील चंद्राचे अस्तित्त्व रेखाटलेले आहे. लेखिकेने सदरील पुस्तक हे आपल्या आई-वडिलांना आणि लेखणीचे कौतुक करणाऱ्या त्यांच्या सासऱ्यांच्या पावन स्मृतिस अर्पण केले आहे.

 ‌‘द्वेष, मत्सर सोडा राग अन्‌‍ चांगुलपणानं सजवा मनाची बाग‌’ अशी सरल शिकवण वाचकांना दिली आहे. फुलपाखरू जसे फुलांवर अलगद बसावे तसे लेखिकेने अनेक प्रसंगातून आपल्या मनाची भावविभोर स्थिती वाचकांसमोर मांडली आहे. अनेक प्रसंगातून लेखिकेची निसर्गाशी असणारी नाळ स्पष्ट दिसून येते. कधी कृष्णकमळ लावल्यानंतर त्याला फुल कसं लागत नाही? या विचाराने व्याकुळ होणारे मन तर कधी रोजच्या येण्या-जाण्याच्या वाटेवरील पारिजातक का सुकून जातोय? या विचाराने व्यथित होणारे मन लेखिकेच्या संवेदनशील मनाची ग्वाही देते. आपल्या अंगणात दोन वेळा चमेली लावूनही ती काही न काही कारणाने टिकली नाही तर तिची जागा पांढऱ्या चाफ्याने भरून काढणारी लेखिका जणू काही हातात नसलेल्या गोष्टीसाठी रडत बसण्यापेक्षा हातात असणाऱ्या गोष्टी आवडीने पूर्ण करण्याचा संदेश देते.

‌‘राधा तो राधा, राधा बिना कृष्ण आधा‌’ असे म्हणत राधेच्या जीवनातील श्रीकृष्णाचे अतूट असलेले स्थान लेखिका आपल्या लेखणीतून आविष्कृत करते. शाळेतील विद्यार्थ्यांना कधी ती राधा होण्यासाठी काय लागतं?  याचा अर्थ समजावते तर कधी खरे प्रेम म्हणजे काय? हे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सांगताना दिसते. रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या संवादातून राधेचे जिवंत रूप लेखिका साकार करते. समोरच्याचे दुःख आपण वाटून घेणे म्हणजे प्रेम असा मोलाचा संदेश आज प्रेमात अर्थहीन, दिशाहीन जीवन भरकटलेल्या पिढीला लेखिका करून देते.


आज कालबाह्य झालेल्या पण पूर्वी जीवनाचा अविभाज्य असणाऱ्या पत्रांची स्मृती आईचे पत्र हरवले यातून ती करून देते. कधी भुलाबाईची आठवण काढून पूर्वापार चालत आलेल्या परंपरांची जाणीव करून देत असताना, आपला पूर्वीचा सकस आहार आणि आताची फास्ट फूड संस्कृती यातील तफावत दाखवून देते. कधी आईने भेट दिलेल्या साडीची अनमोल किंमत तर कधी सासू सुनेच्या नात्यांची हळुवार गंमत लेखिकेच्या हळव्या स्त्री मनाची साक्ष देते. आनंद वाटणारी आनंदी यातून सहजपणे जीवनाचे तत्त्वज्ञान सापडते. कधी विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेली जनाई, कधी कृष्णभेटीसाठी व्याकूळ राधा तर कधी सागराकडे धाव घेणारी नदी या लेखातून ओसंडून वाहते.


माझ्या माहेरची गोदा

सदा वाहे खळखळ

तिचं निळसर पाणी

देई जगण्याला बळ

नदी या लेखातून तिच्याप्रमाणे मन प्रवाही, स्वच्छ, निर्मळ व्हावे ही उदात्त भावना व्यक्त केलीय. नदीच्या कविता, नदीची गाणी यातून नदीवरील अनेक कवितांना, गीतांना उजाळा दिलाय. लेखिकेला चंद्र कधी मामा, भाऊ, सखा तर कधी प्रियकर अशा वेगवेगळ्या रूपात येऊन भेटतो. लेखिका आपला चंद्राविषयी असणारा भाव सांगताना म्हणते की, जसे पावसापासून संरक्षण करणारा रेनकोट त्याप्रमाणे जीवनातील कठीण प्रसंगावर हळुवार शीतलतेचे पांघरून घालणारा मुनकोट. तिचे अवघे जीवनच कधी निसर्गमय, नदीमय, कृष्णमय, चंद्रमय भासते. स्त्रिच्या समर्पित वृत्तीचे सकल दर्शन  ‌‘चंद्रचाहूल‌’ या पुस्तकातून दिसून येते.


ज्याप्रमाणे चकोराचे जीवन चंद्रकिरण प्राशून तृप्त होते असे म्हणतात त्याप्रमाणे वाचकाची तहान चंद्रचाहूलच्या पानापानांतून शमेल हा विश्वास. तेव्हा हे पुस्तक सर्वांनी वाचा आणि संग्रही ठेवा.


चंद्रचाहूल | Chandrachahool
₹250.00₹187.50
Buy Now

लेखिका : मनीषा कुलकर्णी-आष्टीकर

प्रकाशन : चपराक, पुणे

पाने - 144, मूल्य : 250

पुस्तक परिचय : ज्योती मुळे-अंतुरे

8180935777

प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक ३० मार्च ते ५ एप्रिल २०२६



Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page