राग, चीड, मैत्री आणि विश्वास
- 7 days ago
- 3 min read
मी ७० च्या दशकात महाविद्यालयात असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो. त्या काळचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा कुठल्या ना कुठल्या विद्यार्थी संघटनेशी जोडलेला होता. त्यावेळचे विद्यार्थी नेते त्यावेळच्या राजकारणातील नेत्यांपेक्षा जास्त प्रभावी होते. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब आपटे, भालचंद्र कांगो, सुभाष लोमटे, वसंत काळे, अनिरुद्ध देशपांडे, डॉ. विजय गव्हाणे, अमर हबीब, शांताराम पंदेरे, मंगल खिंवसरा, प्रकाश जावडेकर, धरमचंद चोरडिया, माधव ठाकूर असे एकापेक्षा एक ताकतीचे विद्यार्थी नेते त्यावेळी राज्य गाजवत होते. एसेम, ना. ग. गोरे, प्रा. ग. प्र. प्रधान, बाळासाहेब आपटे, रामभाऊ म्हाळगी, मृणाल गोरे, बापूसाहेब काळदाते हे यांचे राजकीय गुरू होते; तर गोविंद तळवलकर, अनंत भालेराव, बाबा दळवी, ग. वा. बेहेरे, यशवंतराव केळकर यांच्या वैचारिक मार्गदर्शनातून ही पिढी घडली होती.

त्या काळातलं सदैव चर्चेत असलेलं नाव होतं कुमार सप्तर्षी. पुण्यातला हा तरुण नेता त्यावेळी महाराष्ट्र गाजवत होता. समाजवादी विचारांची युक्रांद ही महाराष्ट्रातली एक प्रमुख विद्यार्थी चळवळ होती आणि तिचं नेतृत्व कुणाहीकडे असलं तरी त्यातलं अग्रभागीचं नाव होतं कुमार सप्तर्षी.
मनातली तळमळ बोलण्यात उतरविणारं आक्रमक वक्तृत्व, सदैव चळवळीत राहण्याची मनाची धारणा, कोणतेही कष्ट सहन करण्याची क्षमता आणि चर्चेत राहण्याची हातोटी ही अंगभूत वैशिष्ट्ये असणाऱ्या डॉक्टरांनी अभ्यास आणि तर्कशुद्ध चिंतन यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झळाळी आणली.
खरं सांगायचं म्हणजे माझ्यासारख्या संघ परिवारातल्या विद्यार्थ्याला त्यांची आक्रमकता त्यावेळी आवडत असे आणि बोचतही असे. विचारसरणीशी प्रामाणिक असलेल्या प्रत्येकाचं असंच होत असावं. डॉ. बापूसाहेब काळदातेंची भाषणं ऐकताना आम्ही एकीकडे मंत्रमुग्ध होत असू तर दुसरीकडे त्यांच्या विधानांनी मनात चीड निर्माण होत असे.
हिंदू, हिंदुत्व, संघ परिवार यांना कुमारांचा असलेला विरोध अनेकदा अनाठायी वाटत असे. हा माणूस थोडा सौम्य विचार करूच शकत नाही का? असे वाटून मनात चीड निर्माण होत असे. आचार-विचारात थोडी मृदुता आणली तर कितीतरी प्रश्न सामंजस्याने सुटतील असे वाटायचे. कदाचित डॉक्टर त्याकाळी महाराष्ट्रातल्या संघ परिवाराचे शत्रू नंबर एक असतील.
मी पुण्यात आलो आणि डॉक्टरांशी संपर्क वाढला. पत्रकारितेमुळे भेटीही होत असत. त्यावेळी या माणसाच्या वरवरच्या आक्रमकतेमागे जिव्हाळाही दडलेला आहे असं जाणवायला लागलं. एकदा भेटलो तेव्हा सहज बोलताना डॉक्टर म्हणाले, “संघ म्हणजे त्याच त्या लोकांना त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगणारे लोक.” (ते हे वाक्य त्यांच्या भाषणातही अनेकवेळा वापरायचे.)
या वाक्यानंतर ते थोडे थांबले. तेवढ्यात मी त्यांना म्हणालो, “एखादी चांगली गोष्ट मनावर बिंबवायची असेल तर ती पुन्हा पुन्हा सांगावीच लागते. यातूनच तर श्रुती-स्मृती निर्माण झाल्या. तुम्ही समाजवादी लोक चांगल्या गोष्टी सांगता पण त्याचा पाठपुरावा करत नाहीत.”
“उदाहरण दे! उगीच काही बोलू नकोस,” ते म्हणाले.
मी म्हटलं, “'बलसागर भारत होवो' असं साने गुरुजी सांगून गेले. किती समाजवाद्यांनी त्याचा पाठपुरावा केला? संघाने मात्र हे गीत स्वीकारलं आणि वर्षानुवर्षे मेहनत करून या ध्येयासाठी झोकून देणारे हजारो स्वयंसेवक घडवले. 'बलसागर भारत होवो' असं म्हणणारे सगळे एक झाले तर किती चांगलं होईल!”
क्षणभर डॉक्टरांनी पॉझ घेतला. ते काहीच बोलले नाहीत पण त्यानंतर आमच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं.
'लोकसत्ता'ने नगर आवृत्ती सुरू केली तेव्हा त्या टीममध्ये मी होतो. 'नगरच्या मातीचं आणि महानगराच्या धर्तीचं' असं त्या आवृत्तीचं घोषवाक्य होतं. यात नगरचं खरंखुरं प्रतिबिंब पडणं आवश्यक होतं. 'नगरी' भाषेची एक खास लकब आहे. ती लकब नेमकेपणाने पकडणारं डॉक्टरांचं 'राम राम पावनं' हे नगरी ठसक्याचं सदर आम्ही सुरू केलं होतं. डॉक्टर नगर जिल्ह्यातले असल्यामुळे त्यांना नगरची नस न् नस माहीत होती. चुरचुरीत शैली आणि वास्तवातली उदाहरणं यामुळे त्यांचं हे सदर कमालीचं लोकप्रिय झालं होतं. विशेषतः त्यांनी शालजोडीतून ओढलेले कोरडे वाचकांची दाद मिळवत असत.
या सदराच्या संयोजनाची जबाबदारी माझ्याकडे होती. मुळातच शिस्तबद्ध असलेल्या डॉक्टरांनी सदराचं वेळापत्रक कधी चुकवलं नाही. काही वेळा लेख थोडा मोठा व्हायचा. त्यांना फोन केला की ते म्हणायचे, 'तूच तो थोडा कमी करून घे'.
एकदा तर कहरच झाला. लेखातल्या दोन परिच्छेदांमधील मजकूर थोडा बदलायला हवा होता. डॉक्टरांना फोन करून मी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली. डॉक्टर गडबडीत होते. सहजपणे मला म्हणाले, “हे बघ, मी गडबडीत आहे. तूच तुला हवा तो बदल करून घे. तू तो बेमालूम करशील.”
वेगळ्या विचारसरणीच्या माणसावर डॉक्टरांनी टाकलेला हा विश्वास त्यांच्या मनाच्या दिलदारपणाचं प्रतीक होतं.
डॉक्टरांशी अनेकवेळा गप्पा झाल्या. त्यांच्या सदाशिव पेठेतल्या कार्यालयातही दोन-तीन वेळा जाणं झालं. चर्चा होत असे पण संबंधात कधी कटुता आली नाही.
गांधीजींचं तत्त्वज्ञान अंगीकारणारा, इतरांसाठी सदैव झगडणारा, परिस्थितीचं अचूक निदान करणारा, शंकरराव कोल्हे ते माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याशी मैत्री असलेला, चंद्रशेखरांच्या 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेला हा माणूस सत्तेच्या मोहात कधी अडकला नाही. भ्रष्टाचाराचे इमले त्याने कधी उभारले नाहीत. आपली विचारसरणी उसने न घेता त्याने अखेरपर्यंत निभावली.
त्यांच्या बरोबरच्या संबंधांचा आलेख काढायचा असेल तर तो 'राग - चीड - मैत्री आणि विश्वास' या चार शब्दांनी काढता येईल.
त्यांच्या स्मृतीस प्रणाम. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो ही ते मानत नसलेल्या परमेश्वरचरणी प्रार्थना!
- भगवान दातार
9011136900
.jpg)



Comments