top of page

हळूवार फुंकर घालणारा काव्यसंग्रह : वेदनेचे काटे

  • Apr 11
  • 2 min read

शोषितांच्या जीवनाला वातीची आणि मातीची पार्श्वभूमी असते. देहाची वात करून जळावे लागते तेव्हा कुठे जीवनाची मशागत होते. जगण्याच्या मशागतीचा संघर्ष अस्वस्थतेच्या वाटेवर घेऊन जातो. अशा समाजव्यवस्थेला सांधण्यासाठी माणुसकी महत्त्वाची ठरते. संवेदनशील मनाचा कवी सोमनाथ पगार यांचा ‌‘वेदनेचे काटे‌’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. कवी गतिशील व कृतिशील व्यक्तीमत्त्व असल्याने सतत साहित्य स्पर्धा, कवी संमेलने, कार्यशाळांमध्ये जातीने सहभागी असतात. संवेदनशील अशा उमद्या मनाच्या कवीने कवितांमधून वेदनेचा शोध घेतला आहे. विविधांगी विषयावर काव्यलेखन करून व्यापक लेखन करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.


वेदनांची सल मनात न ठेवता जीवन समृद्ध केले. अभ्यासू वृत्ती, नवं शिकण्याची व नवनिर्मिती ही त्यांची आंतरिक उर्मी लिहायला भाग पाडते. मानवी सुख समृद्धी अन्‌‍ संसार हे जगण्याचं रहाटगाडगं आहे. वाटेवर असलेल्या खाचखळग्यांची तमा न बाळगता कवी सोमनाथ पगार गतिशील असल्याचे शब्द त्यांच्या कवितेतून सांगतात. कुठल्याही व्यवस्थेच्या परिघात ते रूतून राहिले नाही.


शिक्षण न घेतलेल्या आई-बापाचं गावखेड्यातील कष्टप्रद जीवन, पावलो पावली अपमान, ठेचा, संघर्ष यामुळे कवीच्या हृदयाला कायम वेदनेचे काटे टोचत राहिले. त्याच्या मनावर फुंकर घालून, मदतीला त्याची कविता धावून आली. बापाच्या कष्टाबद्दल ते म्हणतात...


हाती कष्टाचं रुमणं

नांगरतो बाप दु:ख


कवीला गाव शिवारातील मातीच्या वेदना माहीत आहेत. हा देश विविधतेतून नटलेला आहे. अनेक धर्म, पंथ आणि अगणित जातींनी युक्त असलेल्या या देशात विविधता असली तरी इथे भेदभावाला थारा नाही. अलीकडे जातीयव्यवस्था व झुंडशाहीत एकात्मता सांधण्याची गरज असल्याने सध्याच्या परिस्थितीत मानवता धर्म हवा या कवितेतून वाचकांचे प्रबोधन करतात.


जाती पातीचे हे विष

नाही जात मनातून


कवीचे मन खेड्यातील विषमता, वाढलेले दारिद्र्य व समाजव्यवस्थेतील संघर्षाच्या काट्यांनी व्यथित झालेले आहे. विषमतेच्या तणकटाची खोल नांगरट करावी असे कवीला वाटते. समाजव्यवस्थेची विस्कटलेली घडी नीटनेटकी करण्यासाठी कवी आपल्या लेखणीचा हत्यार म्हणून वापर करु पाहत आहेत. समाजातील भेदाभेद, अराजक आणि अर्थिक विषमता यामुळे या कवीचे मन अस्वस्थ आहे. स्पर्धा परीक्षेची पायवाट चालणाऱ्या कवीची अस्वस्थता लपून राहत नाही. प्रशासनातील बाबूगिरीचा बसलेला फटका अन्‌‍ सरकारी नोकरीपासून वंचित असल्याची दुखरी सल लिहायला भाग पाडते. न्यायव्यवस्थेची चीड शब्दांत मांडण्याचा प्रयत्न कवी करतात. कवी अन्‌‍ पाऊस रिमझिम नातं असते. कवितासंग्रह म्हटला तर पावसाची रचना असतेच. त्यांच्या मनतला पाऊस या शब्दांत...


पाऊस मनात येतो

येतो पाऊस रानात

पाऊस येतो वनात

येतो पाऊस गाण्यात


कविता लिहित असताना प्रतिभा, पांडित्यापेक्षा वास्तव जगण्यातील अनुभव त्यांच्या कवितेतून मांडले आहेत. सामान्य वाचकांच्या हृदयाला भिडणारा आशय या कवितांमधून वाचायला मिळतो. कवितासंग्रह साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झाला ही जमेची बाजू आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या 80 कविता असून त्यात मुक्तछंद, अष्टाक्षरी, गाणी, अभंग, गझल आणि बालकविता अशा प्रकारची विविधता जाणवते. साहित्य अकादमीने सन्मानित कवी ऐश्वर्य पाटेकर यांच्या शब्दसामर्थ्यांची सुंदर गुंफण असलेली प्रस्तावना माणुसकीचा शब्द पेरणारी आहे. ‌‘वेदनांच्या जखमा काळ मिटवतो‌’ अशा शब्दांत डॉ. वेदश्री थिगळे यांची पाठराखण या संग्रहाला आहे. अनुभवलेल्या वेदनांचे काटे महेश कोळी यांच्या मुखपृष्ठातून टोचायला पाहतात. या संग्रहाचे वाचक नक्कीच स्वागत करतील.


कवी : सोमनाथ पगार

प्रकाशक : अनघा प्रकाशन

पृष्ठे - 96

किंमत :48 रूपये.


- राजेंद्र दिघे,

मालेगाव 9421600712

प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक (१३ ते १९ एप्रिल २०२६)

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page