सातारच्या संमेलनाचं फलित म्हणजे परदेशातल्या पाऊलखुणा - कुलकर्णी
- 1 day ago
- 3 min read
अनिल दातीर यांच्या पुस्तकाचे समारंभपूर्वक प्रकाशन
सातारा, (प्रतिनिधी) : “अनिल दातीर हे वृत्तपत्रातून, समाजमाध्यमातून लिहित असतात. आम्ही पुस्तकप्रेमी समूहातही त्यांचं बरंच लेखन मी वाचलं आहे. साताऱ्यातील खंडित झालेली वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी आम्ही काम करत होतो. त्यातून 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात आयोजित केले. त्या साहित्य संमेलनाचं फलित म्हणजे ‘परदेशातील पाऊलखुणा’ हे पुस्तक आहे. या संमेलनाच्या निमित्ताने या पुस्तकाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि अवघ्या दोन महिन्यात ‘चपराक प्रकाशन’ने हे सर्वांगसुंदर पुस्तक वाचकांच्या हातात दिले,” असे गौरवाद्गार सातारच्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांनी काढले.
अनिल दातीर यांच्या ‘परदेशातल्या पाऊलखुणा’ या पुस्तकाचे प्रकाशन साताऱ्यात झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे, शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि नगर वाचनालय साताराचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, डॉ. संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, प्रकाशक घनश्याम पाटील, संतोष जगताप, सचिन देशमुख, राजेंद्र चोरगे आदी उपस्थित होते.
विनोद कुलकर्णी म्हणाले, “या पुस्तकाची भाषा अत्यंत साधी, सरळ, प्रभावी आणि उत्कंठावर्धक आहे. पुस्तकाची मागची बाजू म्हणजेच पाठराखण जरी आपण वाचली तरी संपूर्ण पुस्तक वाचण्याचा मोह आपल्याला होतो. कोणत्याही सामान्य माणसाला सहज समजेल, अशी दातीर यांची भाषा आहे. सोपं लिहिणं हेच जास्त अवघड काम असतं. ते दातीर यांनी सहजपणे केलं असल्यानं महाराष्ट्रभर ते त्यांच्या लेखणीचा ठसा उमटवतील. त्यांचं देशांतर्गत प्रवास वर्णनाचं लेखनही मी वाचलं आहे. आपण त्या-त्या ठिकाणांना कधी भेट दिली नसली तरी तिथे जाऊन आल्याचा भास निर्माण व्हावं असं दातीर यांचं लेखन आहे.
चपराक प्रकाशनने अनेक लेखकांना प्रकाशझोतात आणलं आहे. त्यांच्या पुस्तकांचा दर्जा हा अतिशय उत्तम असतो आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आणि मराठी भाषिकांपर्यंत पोहोचविण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न ते करतात. घनश्याम पाटील हा अतिशय सच्चा मित्र, सच्चा माणूस आहे. जो-जो उत्तम लिहितो त्याचं पुस्तक प्रकाशित व्हायलाच हवं, अशी भावना असणारा हा प्रकाशक आहे. स्वतः लेखकांना गाठून त्यांच्याकडून दर्जेदार लेखन ते करवून घेतात. त्यातून अनेक लेखक लिहिते झाले आहेत. अनिल दातीर यांच्यासारखा आमच्या साताऱ्यातला लेखक त्यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर आणला आहे,” असंही ते म्हणाले.
संदीप वाकचौरे म्हणाले, “गावं सोडलेली माणसं पुन्हा गावात जात नाहीत, अशी सध्या अवस्था आहे. त्यांना गावाच्या, देशाच्या प्रेमात पडावं असं वाटत नाही. आपल्याकडचा जो बुद्धिमान वर्ग विदेशात राहतो तो सहसा पुन्हा भारतात परतत नाही. शिक्षणासाठी विदेशात गेलेली मुलेही तिकडंच राहायचा विचार करतात. असे असताना अर्धे जग पाहणारे अनिल दातीर यांना भारताची मातीच सदैव प्रिय वाटते. परदेशाचे अनुभव प्रभावीपणे मांडतानाच त्यांचं देशप्रेम सर्वेाच्च ठरतं. आदिवासी भाग असलेल्या अकोले तालुक्यातील गणोरेसारख्या छोट्या गावातील एक तरूण साताऱ्यात येतो, स्वतःला सिद्ध करतो, सातारकर त्याला स्वीकारतात आणि अकोले तालुक्यातील परदेशाचे वर्णन करणारे ते पहिले लेखक ठरतात, हे गौरवास्पद आहे. साहित्य समाज घडविण्याचं काम करतं. या पुस्तकानं जगाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करतानाच आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होतो.”
अमित कुलकर्णी म्हणाले, “हौस म्हणून केलेलं हे पर्यटन असलं तरी दातीर यांनी त्यांच्या लेखणीतून ते उंचीवर नेले आहे. आपल्या परिसराचा, राज्याचा, देशाचा, जगाचा शोध घ्यायचा असतो तेव्हा लिखित साहित्याला प्राधान्य दिले जाते. त्याला शास्त्रीय आधार असतो. आपल्याकडे प्रवासवर्णनाची मोठी परंपरा आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यापासून ते मिलिंद गुणाजीपर्यंत अनेकांनी प्रवासवर्णनात्मक लेखन केले आहे. अनिल दातीर हेही आता त्या रांगेत जाऊन बसले आहेत. अनिल दातीर हे मुळातच संवेदनशील असल्याने त्यांनी ज्या पद्धतीने जग टिपलंय ते वाचणं महत्त्वाचं आहे. जग बघितल्याने आपल्या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोनही विकसित होतो.”
“जगाच्या कानाकोपऱ्यात आपण भारताशी निगडित प्रत्येक गोष्टी शोधत असतो. अनिल दातीर यांच्या लेखनातही ते दिसून येते. लेखकांना प्रकाशात आणण्याचे काम प्रकाशक करतात. जेव्हा ‘चपराक’सारखी प्रकाशनसंस्था पुस्तक प्रकाशित करते तेव्हा ते सर्वत्र पोहोचायला मदत होते. माझेही पहिले पुस्तक चपराकने प्रकाशित केले. साताऱ्यात साहित्यिक वातावरण चांगले आहे. इथल्या ग्रंथप्रेमी लोकांमुळे अनेक जण सातत्याने लिहित असतात. फेसबुकसारख्या समाजमाध्यमातून लिहित असताना अनिल दातीर यांचे पहिले पुस्तक चपराकने प्रकाशित केले आहे. ते पुढेही लिहित राहतील आणि त्यांच्या लेखनाला वाचकप्रियता लाभेल,” अशा शुभेच्छा शिरीष चिटणीस यांनी दिल्या.
प्रस्तावनाकार डॉ. संदीप श्रोत्री म्हणाले, “कोणत्याही पुस्तकाला उत्तम प्रकाशक लाभणं हे महत्त्वाचं असतं. मुलगी लग्नाला आल्यानंतर तिला छान सजवावं लागतं. चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील हे काम खूप चांगल्या प्रकारे करतात. निर्मितीत कसलीही तडजोड न करता पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचा हातखंडा आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत मी पुस्तकाविषयी भाष्य केले आहेच. त्यामुळे पुनरावृत्ती करणार नाही. आमच्या पुस्तकप्रेमी समूहात आम्ही सातत्याने लेखनविषयक नवनवीन प्रयोग करत असतो. त्याचे पडसाद मराठी साहित्यात उमटत आहेत.”
लेखक अनिल दातीर यांनी मनोगत व्यक्त करून त्यांचे प्रवासाचे रोचक, रोमहर्षक अनुभव सांगितले. प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रास्ताविक केले. संकेत दातीर यांनी आभार मानले.
अनिल दातीर यांनी जे विदेश दौरे केले त्याचे नियोजन अल्ताफभाई पठाण यांच्या ‘ग्लोबल हॉलिडेज’ या संस्थेने केले होते. या धागा पकडत प्रकाशक घनश्याम पाटील म्हणाले की, “हे प्रवासवर्णन वाचताना अल्ताफभाईंची धडपडही दिसून येते. विदेश सफरींचे आयोजन करताना ग्लोबल हॉलिडेज जी काळजी घेते ती उल्लेखनीय आहे. पुस्तकात त्याचे अनेक किस्से वाचायला मिळतात. त्यामुळे यापुढे हे पुस्तक वाचून फक्त पुणे-मुंबईच नाही तर गडचिरोली-गोंदियापासून लातूर-धाराशिवपर्यंत विदेश प्रवासास उत्सुक असणारे प्रवासी त्यांच्याशी संपर्क साधतील. त्यांच्या कामाची यात सुयोग्य दखल घेतली असल्याने त्यांच्या नव्या प्रवाशांचे स्वागत म्हणून ते हे पुस्तक त्यांना भेट देऊ शकतील.” हे ऐकल्याबरोबर अल्ताफभाईंनी पुढाकार घेत या पुस्तकाच्या पन्नास प्रती विकत घेतल्या.
प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक २३ ते २९ मे २०२६
.jpg)



Comments