top of page

आरोपांचा स्फोट पण सत्य कुठे?

Apr 5
2 min read

भोंदूगिरी उघड होतेय की प्रामाणिकांवरच चाललाय स्वार्थाचा डाव?


पुणे परिसरात धार्मिक व्यक्तिंवर आरोपांच्या घटना अचानक वाढू लागल्याने शहरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला आहे. खरोखर भोंदूगिरी उघड होत आहे का, की काही प्रामाणिक लोकांनाच जाणीवपूर्वक अडकवले जात आहे?


अलीकडील काही घटनांमध्ये धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले आहेत. चमत्कार, अंधश्रद्धा आणि भावनिक प्रभाव वापरून आर्थिक फायदा घेतल्याचे आरोप काही व्यक्तिंवर सिद्धही झाले आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तीविरोधात कारवाईची मागणी तीव्र होत आहे आणि समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मात्र याच वेळी एक वेगळीच बाजूही पुढे येत आहे. स्थानिक स्तरावर काही प्रकरणांमध्ये वैयक्तिक वाद, जमीन व्यवहार, आर्थिक हितसंबंध किंवा राजकीय स्पर्धा यामुळे धार्मिक आणि समाजसेवक व्यक्तिंवर आरोप लावले जात असल्याची चर्चा आहे. काही घटनांमध्ये आरोपांची मालिका इतक्या वेगाने पसरते की चौकशी होण्याआधीच संबंधित व्यक्ती समाजाच्या नजरेत दोषी ठरते.


सोशल मीडियाने या परिस्थितीत मोठी भूमिका बजावली आहे. एखादा व्हिडिओ, एखादी पोस्ट किंवा अपूर्ण माहिती काही मिनिटांत हजारो लोकांपर्यंत पोहोचते. त्यानंतर सत्य शोधण्याची गरजच अनेकांना वाटत नाही. ‌‘जे दिसते तेच सत्य‌’ असा समज पसरतो आणि त्याच क्षणी एखाद्याची प्रतिमा कोसळते. स्थानिक नागरिकांमध्येही याबाबत तीव्र मतभेद दिसून येत आहेत. काहींचे मत आहे की, ‌‘अशा लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,‌’ तर काही जण म्हणतात, ‌‘अनेक वेळा चांगल्या माणसांनाही मुद्दाम अडकवले जाते.‌’ या दोन टोकांच्या प्रतिक्रिया समाजातील वाढत्या अविश्वासाचे चित्र दिसत आहे.


लोकांच्या मते ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते; कारण एका बाजूला भोंदूगिरीविरोधात कारवाई होणे गरजेचे असताना दुसऱ्या बाजूला निरपराध व्यक्तिंवर अन्याय होण्याची शक्यता वाढत आहे. आरोप खरे असोत किंवा खोटे, एकदा का बदनामी झाली की तिचा परिणाम दीर्घकाळ राहतो, हे वास्तव नाकारता येत नाही.


प्रशासनासमोरही हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा प्रकरणांची निष्पक्ष आणि जलद चौकशी करून सत्य समोर आणणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा अफवा आणि आरोपांच्या या साखळीमुळे समाजात अधिक गोंधळ आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत एक गोष्ट स्पष्ट दिसते, आरोपांची गती वाढली आहे पण अनेक घटनांच्या मागील सत्य अजूनही मागेच आहे.


आणि तोपर्यंत कोण भोंदू आणि कोण बळी? हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे.


-सचिन माथेफोड, थेऊर

  • प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक ६ ते १२ एप्रिल



Comments

Rated 0 out of 5 stars.
Couldn’t Load Comments
It looks like there was a technical problem. Try reconnecting or refreshing the page.
bottom of page